25 February 2021

News Flash

गोष्ट आर्थिक माफियांची

२०१३-१४ मध्ये या घोटाळ्यावरील एकेक पदर उलगडू लागले.

माफिया मग तो अमली पदार्थाचा असो की शस्त्रास्त्रांचा किंवा अन्य कोणता, त्यामध्ये शारीरिक बळाचा आणि पर्यायाने खुनाखुनीच्या घटनांचा संबंध येतोच. पण जेव्हा हीच माफियागिरी आर्थिक क्षेत्राशी निगडित नसते तेव्हा घटनांचा वेग तर मर्यादित असतोच, पण रक्ताचा एक थेंबदेखील न सांडता सारा देश हादरून जातो. लाखो करोडो रुपये बेकायदेशीरपणे देशाबाहेर पाठवायचे आणि भ्रष्टाचाराचा काळा पैसा पांढरा करायचा हा हल्लीचा अगदी राजरोसपणे चालणारा धंदा. त्यात पुन्हा राजकारण्यांची आणि निवडणुका जिंकण्याची जोड मिळाली की मग तर पाहायलाच नको. असे गुन्हे सहसा पूर्णपणे उलगडत नाहीत आणि त्यांच्या खटल्याचा वेग चांगलाच मंद असतो. तेव्हा अशा प्रदीर्घ सत्य कथानकाला वेबसिरीजमध्ये मांडण्यास चांगलाच वाव असतो. ही संधी ‘द मेकॅनिझम’ या वेबसिरीजने चांगलीच सार्थकी लावली आहे. ब्राझीलमध्ये गेल्या दीड दशकात झालेल्या आर्थिक महाघोटाळ्यावर आधारित ही वेबसिरीज म्हणूनच पाहण्याजोगी आहे.

२०१३-१४ मध्ये या घोटाळ्यावरील एकेक पदर उलगडू लागले. ऑपरेशन कार वॉश (पोर्तूगीजमध्ये लावो जातो) नावाने हाती घेतलेली ही तपासणी मोहीम हजारो कागदपत्रे, फोन कॉल्स, व्हिडीओ टेप्स, आणि इतर साक्षी-पुराव्यांनी भरलेली आहे. हजारो वॉरन्ट्स, वकिलांची फौज आणि देशाच्या राजकारण्यांमध्ये अगदी खोलवर घुसलेला असा हा गैरव्यवहार होता. ही गुन्हे तपास मोहीम हेच वेबसिरीजचे कथानक आहे. अर्थात त्यात नाटय़मयता आणण्यासाठी थोडे बदल केले आहेत. पण कथानकाचा गाभा तोच राहिला आहे. ब्राझीलमधील एका शहरातील चलन विनिमयाचे काम पाहणाऱ्या व्यावसायिकाच्या कामावरील संशयावरून वेबसिरीजची कथा सुरू होते. तपासणी अधिकारी चक्क कचऱ्यातून (कागदपत्रांचे यंत्राद्वारे केलेले एक सलग तुकडे) एकेक कागद जुळवत पैशांचे मोठे व्यवहार झाल्याचे मांडतो. पण ठोस पुरावा नसल्यामुळे त्याला न्याययंत्रणादेखील पुरेसे सहकार्य करू शकत नाही. त्यातच कायदेशीर पळवाट काढून हा व्यावसायिक कायद्याच्या कचाटय़ातून सुटतो. पण दुसरीकडे तपास अधिकारी मात्र नैराश्यामुळे नोकरीतूनच बाहेर होतो. मध्ये दहा वर्षांचा काळ जातो. फोन टॅपिंग वगैरे सुरूच असते. पण ठोस कारण हाती येत नसते. एके दिवशी चलन विनिमय करणारा व्यावसायिक देशातील सर्वात मोठय़ा तेल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला एक गाडी भेट देतो, आणि त्याचे बिल तपास यंत्रणांच्या हाती लागते. त्यातून मग धागेदोरे जुळवले जाऊ  लागतात आणि पाहता पाहता अटकसत्र सुरू होते. पण शेवटी सगळेच जेव्हा बरबटलेले असतात तेव्हा तपास त्याच वेगाने आणि सक्षमपणे सुरू राहतोच असे होत नाही. त्यातदेखील अनेक अडचणी येतात. काही नाटय़मय वळणं घेतली जातात. आणि मग प्रत्येकजण स्वत:चा बचाव कसा करता येईल याला प्राधान्य देऊ  लागतो.

एकंदरीतच या वेबसिरीजचा सारा डोलारा आहे तो आकडेवारीवर. म्हणजे किती आणि कसा गैरव्यवहार झाला त्यावर. पण ती आकडेवारी अशी एका दिवसात सापडत नसते. किंबहुना सुरुवातीचा काळ तर काहीच ठोस नसते. तेव्हा सिरीजदेखील काहीशी संथ असते. पण एकदा का नेमके आकडे सापडले की मग मात्र कथानक प्रचंड वेगवान होते. कारण अशा वेळी एकाच वेळी अनेक पातळीवर सूत्रं हलू लागतात. हा बदल अगदी नेमकेपणाने मांडण्यात सिरीज यशस्वी झाली आहे. एखादी अटक करेपर्यंतदेखील प्रचंड वरच्या पातळीवर प्रचंड हालचाल होत असते. अशा वेळी मग विरोधी पक्षांपासून सारेच सक्रिय होतात. त्यातच अंतर्गत वाद हादेखील खूप मोठा भाग यामध्ये वारंवार येतो. अगदी न्याययंत्रणेतील वाददेखील त्यामुळे चव्हाटय़ावर येतात.

अर्थात नाटय़मयता आणण्यासाठी मूळ कथानकात काही बदल केले असले तरी काही वेळा कायदेशीर, तांत्रिक बाबी कथानकात मांडल्या जात असताना प्रेक्षकांना पकडून ठेवण्यासाठी कधी कधी विशेष मेहनत घ्यावी लागते. त्यामध्ये मात्र सिरीज कमी पडते. तसेच एकीकडे अद्ययावत तंत्रज्ञान वापरताना काही पात्रांकडून अगदी फालतू म्हणाव्यात अशा ढोबळ चुका होताना दिसतात. कथानकाच्या वेगात ते लपून जाते इतकेच.

खरं तर हा विषय तसा निरस असतो. म्हणजे लोकांना केवळ मोठय़ा आकडय़ानिशी झळकलेले शीर्षक आवडते. पण हे कथानक पडद्यावर मांडताना खूप अडचणी येतात. आर्थिक क्षेत्रातील तांत्रिक बाबी प्रेक्षकाला नेमक्या कळल्या नाहीत किंवा त्याला माहिती आहे असे गृहीत धरून कथा पुढे नेली मग गडबड होऊ  शकते. कारण त्यातील नेमका अर्थ गांभीर्याने पोहोचत नाही. असे काही प्रसंग येथेदेखील होतात. पण टप्प्याटप्प्याने विषयाची व्याप्ती वाढवत नेत, प्रेक्षकांना गुंतवून ठेवायचे तंत्र हे मात्र चांगलेच जमले आहे.

थोडक्यात काय तर देश कोणताही असो, प्रगत अथवा प्रगतिशील किंवा मागास, सध्या अशा प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारांनी प्रत्येकालाच घेरलेले असते. कारण आंतरराष्ट्रीय संबंधातून टपलेले कंत्राटदार, उद्योगपती. त्यामुळे खरे तर प्रत्येक देशात असे काही तरी कथानक सापडू शकते. ब्राझीलचे प्रकरण गाजले आणि वेबसिरीजमुळे ते पाहतादेखील आले आहे. आणि त्याचा मागोवा घेताना किती मेहनत असू शकते हेदेखील जाणवले. यासाठी तरी ही वेबसिरीज पाहायला हरकत नाही.

  • द मेकॅनिझम
  • सीझन पहिला
  • ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 2:36 am

Web Title: the mechanism season 1 netflix
Next Stories
1 मराठी ‘बिग बॉस’१५ एप्रिलपासून
2 ‘गुलमोहर’मध्ये नवीन जोडी रोहन गुजर आणि आरती मोरे
3 ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया.
Just Now!
X