गेले आठ महिने बंद असलेल्या चित्रपटगृहांना ५ नोव्हेंबरपासून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली. या निर्णयाचे राज्यभरातील चित्रपटगृह व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. मात्र निर्णय बुधवारी उशीरा जाहीर झाल्याने या आठवडय़ात ताबडतोब चित्रपटगृहे सुरू करणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कित्येक महिने बंद असलेल्या या चित्रपटगृहांमध्ये साफसफाई, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. त्याचबरोबरीने चित्रपट निर्माते, वितरक, चित्रपटगृह मालक यांच्यातील वाटाघाटींना आता खऱ्या अर्थाने वेग येईल, ही प्राथमिक तयारी पूर्ण करून पुढच्या आठवडय़ात सोमवारपासून किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहे नव्याने सुरू करतील, असा अंदाज ट्रेड विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

हा निर्णय थोडा आधी जाहीर झाला असता तर चित्रपटगृहांना पूर्वतयारीसाठी अधिक वेळ मिळाला असता. आता कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलवण्यापासून सर्व तयारी बाकी आहे. साफसफाई, निर्जंतुकीकरणाबरोबरच अन्य उपाययोजनांची तयारी करायची आहे. शिवाय, चित्रपटगृहात कोणते चित्रपट दाखवायचे, याबद्दलही स्पष्टता नसल्याने चित्रपटगृहे उद्यापासून सुरू करणे शक्य नसल्याचे ‘सिनेमा ओनर्स अ‍ॅण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष नितीन दातार यांनी सांगितले.

देशभरात निवडक शहरांतून चित्रपटगृहे १५ ऑक्टोबरपासून कार्यरत झाली आहेत, मात्र आता महाराष्ट्रातील चित्रपटगृहांचा मार्ग मोकळा झाला असल्याने प्रदर्शनाअभावी रखडलेले मोठमोठे हिंदी चित्रपट, प्रादेशिक आणि हॉलिवूडपटही रुपेरी पडद्यावर परततील, असा विश्वास ‘बुक माय शो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष सक्सेना यांनी व्यक्त केला.

मुंबई-महाराष्ट्र हे चित्रपट व्यवसायाच्या उलाढालीचे मोठे केंद्र असल्याने इथल्या चित्रपटगृहांना परवानगी मिळाल्यावर चित्रपट निर्माते-वितरक मोठय़ा बजेटचे हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू करतील, असे ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी स्पष्ट केले.

पहिल्या आठवडय़ात प्रेक्षक मोठय़ा प्रमाणावर चित्रपटगृहात येणार नाहीत हे लक्षात घेऊन मोठे चित्रपट दिवाळी किंवा दिवाळीनंतरच प्रदर्शित होतील. तोवर इतरांप्रमाणे मुंबई-महाराष्ट्रातही आधी प्रदर्शित झालेले हिंदी-मराठी चित्रपट दाखवण्यावर भर असेल, अशी माहिती चित्रपट वितरक सनी चंदरामाणी यांनी दिली. त्यातल्या त्यात ‘सूरज पे मंगल भारी’ हा नवाकोरा हिंदी चित्रपट टाळेबंदीनंतर १२ नोव्हेंबरला पहिल्यांदा चित्रपटगृहातून प्रदर्शित होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र यासंबंधीच्या ठोस नियोजनाबरोबरच तयारीनिशी चित्रपटगृहांची सुरूवात व्हायला पुढचा आठवडा उजाडेल, असाच या क्षेत्रातील व्यावसायिकांचा अंदाज आहे.

मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्यावरच नाटय़गृहे सुरू

* जागतिक मराठी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने चित्रपट तसेच नाटय़गृहे सुरू करण्यास परवानगी दिली. राज्य शासनाकडून नाटय़गृह सुरू करण्याविषयी नियम तसेच मार्गदर्शक तत्वे आल्यावर त्यावर विचारविनिमय करून नियोजन केले जाईल. करोना संदर्भातील नियम पाळूनच नाटय़गृह सुरू करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केली.

* राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सात महिने ठप्प झालेली नाटय़सृष्टी पुन्हा नव्याने उभारी घेईल. टाळेबंदीच्या कालावधीत नाटय़गृह बंद असले तरीही रवींद्र नाटय़गृहाच्या देखरेखीचे काम सुरू आहे. आम्ही तयारी सुरू केली असून निर्माते विचारणा करतील, त्याप्रमाणे त्यांना नाटय़गृह उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला आकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरे यांनी दिली.