जीन्स म्हणजे अनेकांच्याच आवडीची. मंकी वॉशपासून ते अगदी कलर्ड किंवा टोन्ड जीन्स अशा विविध प्रकारांमध्ये ही जीन्स उपलब्ध आहे. प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या वॉर्डरोबमध्ये या जीन्सचा समावेश असतोच असं म्हणायला हरकत नाही. विविध ब्रँडच्या जीन्सचं कापड, त्यांचे रंग आणि किंमतींमध्ये बराच फरक पाहायला मिळतो. मुळात प्रत्येकजण त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे साजेशा ब्रँडला पसंतीही देतो. अशा या जिव्हाळ्याच्या जीन्ससाठी तुम्ही फार फारतर किती रुपये मोजाल? असा प्रश्न विचारल्यास प्रत्येकजण सोयीप्रमाणे उत्तर देईल. पण, एका जीन्ससाठी ११ हजारहून अधिक रुपये मोजण्याऱ्यांविषयी ऐकून अभिनेता इम्रान हाश्मीला धक्काच बसला आहे.

‘चार्मर’ या लॉस एंजेलिसमधील डेनीम ब्रँडने ‘Extreme Cut Out’ ‘एक्स्ट्रीम कट आऊट’ जीन्स बाजारात आणली आहे. आता ही जीन्स आहे की चिंध्या जोडलेलं कापड हाच प्रश्न अनेकांना पडत आहे. मुळात या जीन्सच्या आगळ्यावेगळ्यी डीझाईनहून तिची किंमत अनेकांच्या भुवया उंचावत आहे. नाममात्र कापडाचा वापर करत तयार करण्यात आलेली ही जीन्स तब्बल ११ हजारहून अधिक रुपयांना विकली जात आहे. हे पाहून थक्क होणाऱ्यांमध्ये अभिनेता इम्रान हाश्मीचाही समावेश आहे. ‘रिप्ड जीन्सचं भविष्य हे पाहा…. नुसत्या धाग्यांसाठी ११ हजार रुपये, हे खरं..’, असं म्हणत इम्रानने ट्विट केलं.

वाचा : UPSC results: मदरशातील शिक्षकाची यशोगाथा, जिंकली केंद्रीय लोकसेवा आयोगाची शर्यत

खरंच आता फॅशनच्या दुनियेत येणाऱ्या या विचित्र ट्रेंडबद्दल सेलिब्रिटींनाही प्रश्न पडू लागले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, ‘चार्मर’चं हे कलेक्शन मात्र जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. याला जीन्स म्हणायचं का असाच प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला.