अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. नैराश्य आणि एकटेपणा यांमुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं, त्या दिवशी सकाळपासून काय काय झालं याची माहिती ‘मुंबई मिरर’च्या वृत्तात देण्यात आली आहे.
‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत रविवारी सकाळी ६.३० वाजता उठला. त्यानंतर घरकाम करणाऱ्या महिलेने त्याला नेहमीप्रमाणे फळांचं ज्यूस प्यायला दिलं. ते प्यायल्यानंतर सुशांत त्याच्या बेडरुममध्ये निघून गेला. एका तासानंतर त्याच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीने दुपारच्या जेवणाबद्दल विचारण्यासाठी दरवाजा ठोठावला. पण सुशांतचं काहीच उत्तर आलं नाही.
सुशांतकडून कोणतंच उत्तर न आल्याने त्याच्यासोबत फ्लॅटमध्ये राहत असलेल्या मित्राने सुशांतच्या बहिणीला फोन केला. बहीण आल्यानंतर सर्वांनी मिळून त्याच्या बेडरुमचा दरवाजा तोडून आत गेल्यास सुशांत बेडशीटने गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला.
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या घरी काम करणाऱ्या तिघांची चौकशी केली जात आहे. यामध्ये दोन जण स्वयंपाक करणारे व एक घरकाम करणारी महिला आहे. सुशांतचे नातेवाईक व शेजाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 15, 2020 1:45 pm