‘महानायक’, ‘शहेनशहा’ आणि ‘बिग बी’ अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अमिताभ बच्चन यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत बराच दबदबा आहे. आजवर त्यांनी बऱ्याच अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यातील काही अभिनेत्रींसोबत बिग बींची जोडी विशेष चर्चेत आली. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नमक हलाल’ या चित्रपटातून स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि सर्वांच्याच मनावर राज्य करुन गेली. ‘आज रपट जाएं तो…’ या गाण्यावर आजही अनेजण ठेका धरतात. अशा या अजरामर गाण्यावर आपली अदाकारी सादर करणाऱ्या स्मिता पाटील संपूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण होईपर्यंत थोड्या अवघडल्याप्रमाणे वावरत होत्या.

अमिताभ बच्चन यांनीच या चित्रपटावेळीचा हा अनुभव शेअर केला. मुख्य म्हणजे चित्रपटांमध्ये चौकटीबाहेरच्या भूमिकांना शह देणाऱ्या स्मिता पाटील या चित्रपटाच्या वेळी संकोचल्यासारखे वागत होत्या यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही, पण हे खरंय. ‘या चित्रपटातील भूमिका साकारताना इच्छा नसतानाही असं का करतोय हे तिचं तिलाच कळत नव्हतं. पण, त्यानंतर स्वत:चं मन वळवून तिने ही भूमिका साकारली होती’, असं बिग बी म्हणले होते. स्मिता पाटील स्वभावाने खूपच चांगल्या होत्या. त्यांचं आपल्यातून निघून जाणं मनाला चटका लावणारं होतं, असंही तो म्हणाले होते.

‘नमक हलाल’ या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. ‘या चित्रपटाचं बरंच चित्रीकरण नव्यानेच बांधलेल्या सेठ स्टुडिओजमध्ये चित्रीकरण सुरु होतं. ८० च्या दशकात इंडस्ट्रीतील तो बहुधा सर्वात पहिला वातानुकूलित सेट होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अजरामर चित्रपटांमध्ये ‘नमक हलाल’चं नावही घेण्यात येतं. यातील ‘के पग घुंगरू बांध मीरा नाची थी’ हे गाणं वाजू लागलं की अनेकांचेच पाय त्यावर ताल धरु लागतात, अशी या गाण्याची जादू होती. मुख्य म्हणजे हा चित्रपटच प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, शशी कपूर, स्मिता पाटील, परवीन बाबी आणि वहिदा रेहमान या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदीही पाहायला मिळाली होती.