नव्या वर्षांच्या सुरुवातीपासूनच सर्व वाहिन्यांवर नव्या मालिका सादर करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. त्यात आपली मालिका इतरांपेक्षा वेगळी ठरावी, याची दक्षता प्रत्येक वाहिनीकडून घेण्यात येत आहे. मात्र या लगबगीमध्ये तीन मराठी वाहिन्यांवरील नवीन मालिकांमध्ये नाशिक शहराचा समान दुवा जोडला गेला आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारीदरम्यान ‘झी मराठी’, ‘ई टीव्ही मराठी’ आणि ‘स्टार प्रवाह’ या वाहिन्या अनुक्रमे ‘असे हे कन्यादान’, ‘माझिया माहेरा’ आणि ‘प्रीती परी तुझवरी’ या नव्या मालिका येत आहेत. ‘युगंधरा’ या डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांच्या कादंबरीवर आधारित ‘माझिया माहेरा’ या मालिकेमध्ये घराची जबाबदारी आणि करिअर यांच्यामध्ये तारेवरची कसरत करणाऱ्या तरुणीची कथा आहे. तर ‘प्रीती परी तुजवरी’ सुंदर प्रेमकथा आणि ‘असे हे कन्यादान’ या मालिकेतून वडील आणि मुलीच्या नात्यातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
या तीनही मालिकांचे विषय भिन्न असले तरी नाशिक शहराशी आलेला संबंध हा त्यांना जोडणारा समान दुवा आहे. ‘प्रीती परी तुजवरी’ आणि ‘माझिया माहेरा’ या दोन्ही मालिकांची पाश्र्वभूमी नाशिक आहे, तर ‘असे हे कन्यादान’ या मालिकेचे कथानक मुंबईत घडत असले तरी नायिकेच्या महाविद्यालयातील चित्रीकरण करण्यासाठी निर्मात्यांनी थेट नाशिक गाठले आहे. ‘माझिया माहेरा’मध्ये दाखवण्यात आलेला नायिकेचा संघर्ष हे नाशिकसारख्या विकसित होत असलेल्या शहरांमधील एक वास्तव आहे, हे लक्षात घेऊन नाशिकची निवड केल्याचे ‘ई टीव्ही मराठी’च्या फिक्शन हेड अपर्णा पाडगावकर यांनी सांगितले.
‘मानसीचा चित्रकार तो’ या मालिकेच्या कथानकाच्या शेवटातून नव्या मालिकेची सुरुवात होणार असल्यामुळे जुन्या मालिकेतील नाशिकची पाश्र्वभूमी नव्या मालिकेत कायम ठेवल्याचे, ‘स्टार प्रवाह’चे बिझनेस हेड जयेश पाटील यांनी सांगितले. तर ‘असे हे कन्यादान’मध्ये मालिकेला मुंबईची पाश्र्वभूमी असूनही नाशिकच्या ‘एम.ई.टी. कॉलेज’चा परिसर आवडल्यामुळे मालिकेचा काही भाग थेट नाशिकला जाऊन चित्रित केल्याचे मालिकेचे निर्माते शशांक सोळंकी यांनी सांगितले. त्यामुळे योगायोगाने का होईना या सर्व नव्या मालिकांमध्ये ‘नाशिक’ शहराचा दुवा जुळून आला आहे.