आमिरचा चित्रपट हा चीनमध्ये बक्कळ कमाई करणार हे समीकरण जणू ठरलेलं आहे. ‘थ्री इडियट’, ‘पीके’, ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारख्या आमिर खानच्या चित्रपटाला चिनी प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. इतकंच नाही तर ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’नं तर चीनमध्ये भारतापेक्षाही सर्वाधिक कमाई करत विक्रम रचला. ‘सिक्रेट सुपरस्टार’नं सातशे कोटींहून अधिक तर ‘दंगल’नं पाचशे कोटींहून अधिकची कमाई केली. मात्र नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या आमिरच्या ‘ठग्स’कडे चीनी प्रेक्षकांनी पूर्णपणे पाठ फिरवली.

आतापर्यंतची निराशाजनक कमाई ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नं केली आहे. या चित्रपटानं चीनमध्ये ३२. ९३ कोटींची कमाई केली आहे. नाताळाच्या सुट्ट्या असतानाही आमिरच्या चित्रपटाला मिळाला हा सर्वात कमी प्रतिसाद होता. आमिरचा ‘ठग्ज’ हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर तितकाच जोरात आदळला. प्रेक्षक आणि समिक्षकांकडूनही या चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या.

अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख, कतरिना कैफ अशी तगडी स्टारकास्ट असतानाही प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवायला ‘ठग्ज’ पूर्णपणे अपयशी ठरला. चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळल्यानंतर आमिर खाननं या चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारीही स्वीकारली.