ठग्ज ऑफ हिंदुस्थान

खरे तर अमिताभ बच्चन आणि आमिर खान ही दोन नावेच लोकांना भुरळ पाडायला पुरेशी होती. तरी त्यांच्या मागे उभे असलेले यशराज बॅनर, दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य, व्हीएफएक्सचा करिश्मा, त्यात १७९५ च्या काळातील गोष्ट म्हणून मोट बांधूनही प्रेक्षकांच्या वाटय़ाला प्रत्यक्षात फसवणूकच आली आहे.

‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’वर पहिली टीका झाली ती म्हणजे ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबिअन’ या चित्रपटाची नक्कल असल्याची.. त्याबद्दल कितीही नाही म्हटले तरी आमिर खानचा फिरंगी मल्लाह आणि पायरेट्सचा जॅक स्पॅरो या दोन व्यक्तिरेखांमध्ये साधम्र्य आहेच. तेच साधम्र्य समुद्रावर चालणाऱ्या चाचे युद्धातही आहे. इथेही समुद्री चाच्यांचे एक विश्व आहे. त्यात खरोखरच जहाजे लुटणारे चाचेही आहेत. तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या चाचेगिरीचा वापर करणारी एक फौजही आहे. ही फौज खुदाबक्ष जहाजीने (अमिताभ बच्चन) उभारली आहे. १७९५ चा हा काळ जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात प्रवेश करती झाली होती. व्यापाराच्या उद्देशाने भारतात शिरलेल्या ब्रिटिशांनी अनेक राजांना आपले मांडलिकत्व स्वीकारायला लावत सत्ताकारणाला सुरुवात केली होती. त्या काळात राजेरजवाडय़ांसह सामान्यांमध्ये जर बंडखोरीची प्रतिक्रिया उमटली असेल तर ती साहजिकच होती. देशभक्तीचा रंग चढवत तरी निदान अशा एखाद्या प्रयत्नाची गोष्ट दिग्दर्शकाने रंगवली असती तरी चित्रपटाला काही एक अर्थ प्राप्त झाला असता. मात्र इथे तसे काही घडत नाही. मुळात इतकी भव्य पाश्र्वभूमी घेऊनही एक टुकार गोष्ट सांगण्याचा दिग्दर्शकाचा आग्रह न कळण्यासारखा आहे.

अनेकदा आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटांमध्ये सगळी कथा त्याच्याच बाजूने फिरणार अशी एक भीती असते. राजकुमार हिरानी, नितेश तिवारी यांसारख्या दिग्दर्शकांनी आपापल्या पद्धतीने कथेतून आणि व्यक्तिरेखांमधून आमिर कुठेच गोष्टीपेक्षा वरचढ होणार नाही, याची काळजी घेतली आहे. मात्र विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटात कथेवरच काटेकोरपणे काम झालेले नाही. अमिताभ बच्चन आणि आमिर खान दोघेही समोरासमोर येतील. काही एक जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळेल ही अपेक्षाही इथे फोल ठरली आहे. त्याउलट एका क्षणी अमिताभ यांनी साकारलेली खुदाबक्ष ही व्यक्तिरेखा गुडूप होते आणि इतका वेळ फिरंगी मल्लाहभोवती फिरणारी कथा पुन्हा एकदा त्याच्याच अवतीभोवतीने नाचत राहते. कतरीना कैफची सुरैया इथे फक्त नृत्यापुरतीच वापरली आहे, तर राजकुमारीच्या भूमिकेत फातिमा सना शेख कुठेच फिट बसत नाही. तिच्यातली आणि फिरंगीतली नजरानजरही काही क्षणापुरतीच.. त्यातून पुढे काहीच होत नाही. मुळात तीन तास पडद्यावर सुरू असलेल्या या चित्रपटात काहीच घडत नाही. आणि काही तरी घडायची वाट पाहून कंटाळलेला प्रेक्षक निदान चित्रपट संपेल कधी याची वाट पाहत राहतो. आमिर खानचा फिरंगी मल्लाच तेवढा लक्षात राहतो, कारण करण्यासारखे सगळे काम त्याच्याच वाटय़ाला आले आहे. बाकी चित्रपटातील गाणी, तो काळ आणि गोष्ट यांचा एकमेकांशी सुतराम संबंध नाही. त्यामुळे एकूणच भव्यदिव्यपणाच्या नावाखाली प्रेक्षकांना ठकगिरीच जाणवते.

* दिग्दर्शक – विजय कृष्ण आचार्य

* कलाकार – अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरीना कैफ, फातिमा सना शेख, झीशान अयुब, रोनित रॉय.