10 August 2020

News Flash

‘टिकीट टू बॉलिवूड’

फिल्मसिटीच्या मोकळ्या रस्त्यांवरून फिरताना अचानक एके ठिकाणी दिसणाऱ्या लाकडांच्या रचनेकडे बोट दाखवून गाईड सांगतो ‘या मोकळ्या मैदानास जोश मैदान असे म्हणतात.

| February 8, 2014 03:31 am

फिल्मसिटीच्या मोकळ्या रस्त्यांवरून फिरताना अचानक एके ठिकाणी दिसणाऱ्या लाकडांच्या रचनेकडे बोट दाखवून गाईड सांगतो ‘या मोकळ्या मैदानास जोश मैदान असे म्हणतात. शाहरूखच्या जोश चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले होते. आता सलमान खानच्या ‘किक’साठी सेट उभारणी सुरू आहे.’ गाईडच्या शब्दांबरोबर पाहणाऱ्यांच्या नजरेसमोर ‘जोश’ चित्रपटाची रिळं सरकू लागतात.
आतापर्यंत केवळ मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणापुरते मर्यादित असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी) चे दरवाजे सर्वसामान्यांसाटी खुले झाले आहेत. एमटीडीसी आणि फिल्मसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने बॉलिवूड पर्यटनाची सुरुवात करण्यात आली आहे. बॉलिवूडच्या या मायानगरीची सफर करण्यासाठी तिकीटही उपलब्ध झाले असून फिल्मसिटीच्या बाहेर खास तिकीट कक्ष उभारण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. बॉलिवूडच्या या सफरीमध्ये फिल्मसिटीतील चित्रीकरणस्थळे, न्यायालय, मंदिर असे काही नेहमीचे सेट्स, मालिकांचे सेट्स आणि प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू असताना कलावंतांना पाहणे अशा सगळ्या गोष्टी अनुभवता येणार आहेत.  युनिव्र्हसल स्टुडिओ, पाईनवूड स्टुडिओसारख्या नामांकित स्टुडिओंचा अभ्यास करून त्या धर्तीवर फिल्मसिटीची सफर घडविणाऱ्या या बॉलीवूड टुरिझमची संकल्पना विकसित करण्यात आली आहे अशी माहिती फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली. मात्र त्याचबरोबर पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात येत असल्याने चित्रीकरणात बाधा येऊ नये याची काळजी घेत ही सफर घडविणे हे एक आव्हान आहे. त्यामुळे सध्या प्राथमिक स्तरावर याची सुरुवात करण्यात आली आहे. त्यातल्या त्रुटी, कच्चे दुवे लक्षात घेऊन हळूहळू त्यात सुधारणा केली जाईल आणि बॉलिवूड पर्यटनाचे एक नवे पर्व सुरू करणारी ही संकल्पना अधिकाधिक लोकप्रिय होत जाणार आहे, त्यांनी दिले.  या सफरीमधील लेखक अभिराम भडकमकर यांनी खूप संशोधन करून एक फिल्म तयार केली. अमीन सयानी यांच्या आवाजात असलेली ही फिल्म, फिल्मसिटीतील खास स्थळे, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या जुन्या चित्रपटांच्या आठवणी सांगत सांगत या मायानगरीचा प्रवास पर्यटकांना घडविण्यात येणार आहे. सध्या ही सफर अगदीच प्राथमिक स्तरावर सुरू करण्यात आली असून हळूहळू त्यात सुधारणा केली जाईल. त्यात नवीन माहिती आणि ठिकाणांची भर पडत राहील असे आश्वासन फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 3:31 am

Web Title: ticket to bollywood
Next Stories
1 मराठी चित्रपटात हिंदी ‘कॅब्रे’!
2 आणि ‘दगडू’ अभ्यासाला लागला..
3 सलमान खान बनला न्हावी!
Just Now!
X