भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. अक्षय कुमार आणि विद्या बालन यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. ‘मिशन मंगल’ प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाविषयी आणि त्याच्या पोस्टरची विशेष चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या पोस्टवर अक्षय कुमारला विशेष महत्व देण्यात आलं असून अन्य कलाकारांना त्याच्या तुलनेत कमी महत्व देण्यात आल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. त्यातच आता अभिनेत्री तिस्का चोप्रानेदेखील तिचं मत मांडलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, “अक्षय कलाविश्वातील सुपरस्टार आहे, याविषयी कोणतंही दुमतं नाही. त्याच्याप्रमाणेच जर या पोस्टरमधील एक जरी अभिनेत्री सुपरस्टार असती तर सहाजिकच तिच्या फोटोलाही तितकंच महत्व मिळालं असतं. माझं एक साधं मत आहे, चित्रपटाच्या कथेलाच केवळ स्टार राहू द्या”, असं तिस्काने एका मुलाखतीत सांगितलं.

पुढे ती म्हणते, जर आजच्या काळात तुम्ही स्त्रीप्रधान चित्रपटाची निर्मिती करत असला तर कोणीही तुम्हाला वेड्यात काढणार नाही. उलटपक्षी या चित्रपटाच्या कथेपेक्षा तो चित्रपट एक स्त्रीप्रधान चित्रपट आहे, या अनुषंगानेच प्रत्येक प्रेक्षक पाहिलं. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्यामुळे आपण कोणत्याही चित्रपटाला आता तो पुरुषप्रधान चित्रपट आहे असं म्हणून शकत नाही. किंबहुना तसं म्हणायची गरजदेखील नाही आणि तसा कोणता नियमही नाही. त्यामुळे आता चित्रपट पाहताना चित्रपटाची कथा महत्वाची आहे. तो चित्रपट स्त्रीप्रधान आहे की पुरुषप्रधान हे महत्वाचं नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत”.

दरम्यान, तिस्का लवकरच ‘गुड न्यूज’ या चित्रपटामध्ये झळकणार असून तिच्यासोबत अक्षय कुमार आणि करिना कपूर स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे.