विविध नृत्यप्रकार आत्मसात करण्यासाठी झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्ये आपण भाग घेतल्याचे व्हीजे आणि अभिनेता पूरब कोहलीचे म्हणणे आहे. झलकच्या ७व्या पर्वात सहभागी होण्यासाठी पूरब कमालीचा उत्सुक आहे. या शोमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी तो कसून सराव करत आहे. विविध नृत्यप्रकारांचे यथोचित कसब आत्मसात करण्यासाठी आपण ‘झलक दिखला जा’मध्ये सहभाग घेतला असून, आपल्या क्षमतेच्यापलीकडे जाऊन टॅंगोसारखे आंतरराष्ट्रीय नृत्यप्रकार करण्याचा अनुभव मिळणार असल्याचे पूरबचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी शामक डावरच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच सालसा नृत्यप्रकार शिकताना त्याने नृत्यकलेचा अनुभव घेतला. पुरबने त्याची कोरिओग्राफर मोहिनाला शक्य तिथे सालसा आणि टँगो नृत्यप्रकारांचा काही प्रमाणात अवलंब करण्याची विनंतीदेखील केली आहे. करण जोहर, माधुरी दीक्षित आणि कोरिओग्राफर रेमो डिसुझा हे या शोमध्ये पंचाच्या भूमिकेत दिसतील. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री व गतवर्षीची झलकची विजेती दृष्टी धामी आणि रणवीर शौरी यांची जोडी या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.