रेश्मा राईकवार

ट्रिपल सीट

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

एक नायक आणि दोन नायिका असा प्रेमाचा त्रिकोण हिंदीतून तर आपण कित्येक वेळा पचवला आहे, अजूनही पचवतो आहोत. मराठीतही असा प्रेमत्रिकोण अनुभवलेलाच नाही, असं म्हणणं धाष्टर्य़ाचं ठरेल. त्यामुळे एका चौकटीतली अशीच ही प्रेमकथा आहे, पण अंकुश चौधरीला असा नायक साकारण्याची संधी देणारा ‘ट्रिपल सीट’ त्याच्या हलक्याफुलक्या मांडणीमुळे रंजक ठरतो. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट अंकुशच्या चाहत्यांना त्याला पुन्हा एकदा रोमँटिक भूमिकेत पाहण्याची संधी देतो.

एका वास्तव घटनेवर आधारित अशा या चित्रपटाची कथा अभिजीत दळवी यांनी लिहिली आहे. तर संकेत पावसे याने पहिल्यांदाच दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक-लेखक ही सगळीच मंडळी नगरमधली आहेत. त्यामुळे चित्रपटाची कथाही नगरमध्येच घडते. नगरमध्ये राहणारा कृष्णा (अंकुश चौधरी) चालकाचा व्यवसाय करतो आहे. कृष्णाची स्वत:ची गाडी आहे. आदर्श प्रेमी वाटावा अशा साध्या-सरळ कृष्णाला मोबाइलवर एक मिस कॉल येतो. गमतीने दिल्या गेलेल्या या मिसकॉलमुळे कृष्णाची ओळख मीराशी (शिवानी सुर्वे) होते. मीरा आणि कृष्णामध्ये चांगलीच घट्ट मैत्री होते. एकमेकांना केवळ फोनवरून ओळखणारे हे दोघे प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांना भेटायची नाही, असं पक्कंठरवून टाकतात. त्याच वेळी कृष्णाच्या आयुष्यात वृंदाचा (पल्लवी पाटील) प्रवेश होतो. कृष्णा आणि वृंदाचा विवाह ठरतो. आणि नेमके त्याच वेळी नियती कृष्णा आणि मीराला समोरासमोर आणते. मैत्रीचा घट्ट धागा कृष्णा-मीराला एकत्र आणतो की वृंदाला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडलेला कृष्णा तिच्याशी ठरल्याप्रमाणे लग्न करतो? का या दोघींना एकत्र घेत कृष्णा ट्रिपल सीट आयुष्याच्या सफरीवर निघतो, याची उत्तरं प्रत्यक्ष सिनेमातूनच जाणून घ्यायला हवीत.

‘ट्रिपल सीट’च्या कथेचा साचा नेहमीचाच असला तरी त्याच्या मांडणीत थोडा तजेला आहे. कुठेही भडक मांडणी नाही, पण म्हणून खोलवर विषय नेला आहे, असेही होत नाही. प्रेमत्रिकोणाचा हा विषय वरवरच हाताळला आहे, मात्र त्यात मेलोड्रामा टाळला असल्याने तो थोडासा सुखकर होतो. अनेक ठिकाणी तो कारण नसताना खेचल्यासारखा वाटतो. पण मुळातच कथेचा जीव थोडा असल्याने हे जोडकाम कथेला पुढे नेण्याचे काम करते. चित्रपटातील व्यक्तिरेखांची मांडणी वास्तव पद्धतीने करण्यात आली आहे. यात कृष्णाच्या कुटुंबातील सदस्य असतील किंवा मीराचे आई-बाबा. या व्यक्तिरेखा कु ठेही अचानक बदलत नाहीत. त्या आहेत तशाच समोर येतात. कृष्णा आणि त्याचे वडील अण्णा (विद्याधर जोशी) यांच्यातील नाते सुधारण्याचा मीराचा प्रयत्न असो किंवा मीरा आणि आईमधला संवाद असो.. चित्रपटातील काही जागा दिग्दर्शक-लेखकाने खूप छान रंगवल्या आहेत. मात्र कथेच्या अनुषंगाने चित्रपटाचा विचार केला तर ती एक कौटुंबिक सुखांतिका असल्याने ती एकाच वळणाने जाते. चित्रपटातील कलाकारांनी यात रंगत आणली आहे. अंकुशला त्याचे चाहते नेहमीच या भूमिकेत पाहणं पसंत करतात. त्यामुळे वर म्हटलं तसं त्याच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी आहे. अशा भूमिका तो चोख बजावतो, त्यामुळे इथेही तो अगदी सहजपणे त्याच्या शैलीत कृष्णा रंगवतो. शिवानी सुर्वेने मीराची भूमिका उत्तम साकारली आहे. मीराच्या सगळ्या भावभावनांच्या छटा तिने खूप सुंदर पद्धतीने रंगवल्या आहेत. पल्लवी पाटीलनेही तिच्या वाटय़ाला आलेली छोटेखानी भूमिका सहजशैलीत रंगवली आहे. या दोघींशिवाय विद्याधर जोशी, राकेश बेदीसारख्या कलाकारांनी या चित्रपटात जान आणली आहे. वैभव मांगलेंनी त्यांची भूमिका उत्तम साकारली आहे तर इन्स्पेक्टर दिवाणेंच्या छोटेखानी भूमिकेत अभिनेता प्रवीण तरडे भाव खाऊन गेले आहेत. प्रेकमथा असल्याने त्याला चांगली गाणी असेल तरच मजा येते. ती कसर इथे अविनाश-विश्वजीत यांच्या संगीताने उत्तमप्रकारे भरून काढली आहे.

सणासुदीच्या आनंदी वातावरणात थोडी हसवणारी, थोडी भावनिक अशा कौटुंबिक निखळ मनोरंजक चित्रपटाचा शिडकावा आवश्यक असतो. अंकुश, शिवानी आणि पल्लवीची ‘ट्रिपल सीट’ ती मागणी पूर्ण करतो.

ट्रिपल सीट

दिग्दर्शक – संकेत पावसे

कलाकार – अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी, वैभव मांगले, योगेश शिरसाठ, राकेश बेदी, माधवी सोमण.