अभिनेता सुबोध भावेने जवळपास नऊ-दहा वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. २००९ मध्ये ‘कुलवधू’ ही मालिका केल्यानंतर आता झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून सुबोध प्रेक्षकांच्या भेटीला आला. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि ऑगस्टमध्ये सुरु झाल्यापासून ती सातत्याने टीआरपी रेटिंग्जमध्ये वरच्या क्रमांकावर राहिलीये. पण या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. वय विसरायला लावणारी ही प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता आहे.

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुबोधने मालिकेबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. ‘२०१९ या वर्षात मी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं आहे. मला काहीही झालं नाही, काळजी करू नका. पण तरीसुद्धा खूप काही गोष्टी डोक्यात आहेत. गेल्या १७-१८ वर्षांपासून मी खूप काम करतोय. त्यातून आनंद मिळतोच आहे पण कधीकधी खूप दमायला होतं, थकायला होतं. झोप पूर्ण होत नाही. खाण्याच्या वेळा बिघडतात आणि त्याचा परिणाम कुठेतरी कामावर होतो. मला असं वाटतं की आता या धावणाऱ्या घो़ड्याला थोडं लगाम लावलं पाहिजे. यावर्षी त्या पदधतीने काम करायचं ठरवलंय. खूप काम यावर्षी करणार नाहीये. थोडं पण चांगलं आणि सकस काम करायचं ठरवलंय. अर्थातच ‘तुला पाहते रे’ हा मालिका काही महिने चालू राहील. ती निरोप घेईपर्यंत तरी दुसरं कुठलं काम हाती घेतलं नाहीये,’ असं सुबोध म्हणाला.

Video : मुस्लीम असून ‘ठाकरे’तील भूमिका स्वीकारण्यावर नवाजुद्दीन म्हणतो..

याच मुलाखतीत सुबोधने ‘अश्रुंची झाली फुले’ हे नाटक करणार असल्याचंही जाहीर केलं आहे. हे नाटक गुढीपाडव्यापर्यंत रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. त्यामुळे साधारणपणे एप्रिलपर्यंतच ‘तुला पाहते रे’ मालिका चालू राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मालिका निरोप घेईपर्यंत दुसरं काम हाती घेणार नाही आणि गुडीपाडव्यापर्यंत ‘अश्रुंची झाली फुले’ हे नाटक रंगमंचावर येईल असं सुबोधने म्हटल्याने हा प्रश्न उपस्थित होत आहे.