नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची अभिनेता अक्षय कुमारने मुलाखत घेतली. या मुलाखतीत नेहमीप्रमाणे राजकीय प्रश्न नव्हते, तर मोदींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारण्यात आले. त्यांचा हा व्हिडिओ सर्वच स्तरात व्हायरल झालेला पहायला मिळाला आहे. अनेकांनी तर अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना भाजपाचा प्रचार करत असल्याची टीका देखील केली आहे. त्यावर ट्विंकलने ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“कोणाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देणं याचा अर्थ मी स्वतःचा प्रचार करतेय असा होत नाही. या क्षणी तरी मी केवळ अशा ‘पार्टी’त सहभागी होऊ इच्छिते की  जिथे मुबलक व्होडका मिळेल आणि मी दुसऱ्या दिवसापर्यंत ‘हँगओव्हर’मध्ये राहीन” असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

याआधी अक्षयने जेव्हा सोशल मीडियाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा मोदींनी गमतीशीर पद्धतीने उत्तर दिले होते. ‘मी ट्विंकल खन्ना यांचेसुद्धा ट्विट्स वाचतो. कधी कधी मला वाटतं की ट्विटरवर त्या माझ्यावर ज्याप्रकारे राग व्यक्त करत असतात त्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल. कारण त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघतो. एकप्रकारे मी तुमची मदतच करत आहे,’ असं मोदींनी मुलाखतीत म्हटलं होतं.

त्यावर ट्विंकलने ‘पंतप्रधानांना फक्त माझ्याविषयी माहिती नसून ते माझे लिखाणसुद्धा वाचतात, याकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून बघते,’ असे ट्विट तिने केले होते.