WWE सुपरस्टार ‘द अंडरटेकर’ आपल्या अजब-गजब एण्ट्रींसाठी प्रसिद्ध आहे. कधी मोटारबाईकवरुन तर कधी चक्क शवपेटीकेतून तो स्टेजवर फाईटिंग करण्यासाठी हजर होतो. आश्चर्यचकित करणाऱ्या आगमनासाठी प्रसिद्ध असलेला अंडरटेकर एकदा आगीत भाजला देखील होता. त्या स्पर्धेत तो थोडक्यात बचावला होता. १० वर्षांपूर्वी घडलेली ही धक्कादायक घटना WWE क्लासिक मॅचच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

काय घडले होते त्यावेळी?

२०१० साली एका एलिमेनेशन चेंबर मॅचदरम्यान ही धक्कादायक घटना घडली होती. त्यावेळी अंडरटेकर WWE चँपियन होता. क्रिस जॅरिको, सीएम पंक, जॉन मॉरसन, आर-ट्रूथ आणि रे मेस्टीरियो या पाच स्पर्धकांनी त्याला एकाच वेळी आव्हान दिले होते. या स्पर्धेत एण्ट्री करताना त्याच्या दोन्ही बाजूस आग पेटत होती. या आगीतील काही ठिणग्या त्याच्या कपड्यांवर पडल्या. त्यामुळे कपड्यांना देखील आग लागली. लढाईसाठी रिंगमध्ये येणारा अंडरटेकर स्वत:ला वाचवण्यासाठी आगीशी लढत होता. त्यानंतर लगेचच पाण्याचा फवारा मारुन ही आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत त्याचे केस आणि पाठ भाजली होती. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. परंतु त्यावेळी जखमी असलेला अंडरटेकर उपचारासाठी मात्र रुग्णालयात गेला नाही. त्याही अवस्थेत तो रिंगमध्ये गेला आणि मॅच संपवूनच बाहेर पडला.

खरं तर रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यासाठी डॉक्टर त्यांला विनंती करत होते. मात्र त्या दिवशी जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या नजरा अंडरटेरकडे डोळे लावून होत्या. तब्बल सात महिने चाहत्यांनी या मॅचसाठी वाट पाहिली होती. त्यामुळे त्याने ती मॅच रद्द केली नाही. जखमी अवस्थेतही तो चाहत्यांच्या मनोरंजनासाठी लढत होता. आज अंडरटेकर WWE मधून निवृत्त झाला आहे. मात्र आजही हा किस्सा आठवून चाहते भारावून जातात.