रितेश देशमुख सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘बँक चोर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमातील ‘तशरिफ’ या गाण्याचं कप व्हर्जन सध्या सोशल मीडियात चांगलंच गाजतं आहे. यात रितेशसह या सिनेमातील इतर कलाकार मंडळी कप व्हर्जन गाणं गाताना दिसत आहे. या गाण्याचे शब्द वेगळे असल्याने तो चर्चेचा विषय ठरत आहे.

‘बँजो’ सिनेमानंतर रितेश देशमुख ‘बँक चोर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बँजो’ सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नव्हता. त्यामुळे या सिनेमात तरी रितेशची जादू चालेल का, हा एक मोठा प्रश्न आहे. पण या सिनेमाचा ट्रेलर पाहून खूप दिवसांनी निखळ मनोरंजन होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. रितेशचा या सिनेमातील लूकही उत्सुकता वाढवत आहे. अशात हे कप साँग व्हर्जनही आकर्षण ठरत आहे.

एका कॅफे शॉपमध्ये बसून ‘तशरिफ’ हे गाणं चित्रीत केलं आहे. त्यामुळे या गाण्याचे शब्द आणि आजूबाजूचे वातावरण यांची योग्य सांगड घातलेली पाहायला मिळते. हे रोमांचक गाणं रोचक कोहली याने गायलं असून त्यानेच संगीतबद्ध केले आहे. तर अदिश वर्माने हे गाणे शब्दबद्ध केले आहे. ‘बँक चोर’ या नावातच या सिनेमाचं कथानक काय असेल याचा अंदाज येतो.

‘सर्व साधारणपणे सिनेमाचे प्रमोशन करण्याचे फंडे ठरलेले असतात. आधी सिनेमाचा पोस्टर येतो मग टिझर, ट्रेलर, गाणे, डायलॉग अशा पद्धतीनेच प्रमोशन केले जाते. पण व्हाय- फिल्म्सने मात्र बँक चोर सिनेमासाठी प्रमोशनचे वेगळे फंडे वापरायचे ठरवले आहेत. आम्ही सिनेमाच्या प्रमोशनसोबतच त्यातल्या व्यक्तिरेखांचेही प्रमोशन करत आहोत. खास प्रमोशनसाठी आम्ही वेगळे शूटही केले. येत्या दिवसांत तुमच्यासोबत हे व्हिडिओही शेअर केले जातील,’ असे रितेशने एका मुलाखतीत सांगितले.

बंपी दिग्दर्शित ‘बँक चोर’ या सिनेमाची निर्मिती यश राज बॅनरचे यूथ प्रॉडक्शन हाऊस ‘व्हाय- फिल्म्स’ करत आहे. ‘व्हाय- फिल्म्स’ने याआधी ‘मॅन्स वर्ल्ड’, ‘बँड बाजा बारात’ आणि ‘लेडिज रूम’ यांसारख्या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. येत्या १६ जूनला हा सिनेमाला प्रदर्शित होणार आहे.