‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा…’ हे गाणे आजही एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारे असे आहे. अनिल कपूर यांच्या ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातील हे लोकप्रिय गाणे कसे तयार करण्यात आले याबद्दल अभिनेता आणि रेडिओ जॉकी अनू कपूर यांनी रेडिओवरील कार्यक्रमात याविषयी माहिती दिली आहे. खरे तर चित्रपटाच्या मूळ संकल्पनेत या गाण्याला स्थानच नव्हते. पण गीतकार जावेद अख्तर यांनी या ठिकाणी गाणे असायला हवे, असे सुचविले. जावेद अख्तर यांच्या सूचना अंमलात आणल्यानंतर गाणे लिहिण्याची जबाबदारी अर्थातच जावेद अख्तर यांच्यावर आली. चित्रपटातील क्षण संगीतमय करण्यासाठी जावेद अख्तर यांना विशेष वेळ देण्यात आली होती.

म्युझिक स्टुडिओमध्ये जाण्यासाठी अख्तर तयार झाले मात्र त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, गाणे तर लिहिलेच नाही. आता काय करायचे या विचाराने जावेद अख्तर बैचेन झाले होते. गाणे लिहिण्यासाठी वेळ मिळावा आणि फजीती होऊ नये यासाठी त्यांना योग्य कारण हवे होते. बराच विचार केल्यानंतर त्यांना ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा..’ ही ओळ सुचली. विशेष म्हणजे गाणे अशाच दृश्यावर होते की ज्यामध्ये हिरो पहिल्यांदाच हिरोईनला पाहत असतो. जावेद अख्‍तर यांनी मिटींगमध्ये ही ओळ सांगून गाणे या आळीवर असावे असे सांगितले. बराच विचार केल्यानंतर मला ही ओळ सुचली आहे. तुम्हाला आवडली असेल तर गाणे लिहायला सुरुवात करेन. असे अख्तर म्हणाले होते. अख्तर यांची ही कल्पना संगीतकार आरडी बर्मन आणि दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांना फारच आवडली. त्यांनी हे गाणे लिहिण्यास सुरु करा असेही सांगितले. त्यानंतर फारच कमी वेळात जावेद अख्तर यांनी हे गाणे लिहिले आणि कमी वेळ मिळून देखील बर्मन यांनी हे गाणे संगीतबद्ध केले.

‘१९४२- अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटामध्ये अभिनेता अनिल कपूर आणि मनिषा कोयराला यांची प्रेम कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. त्यांच्यासोबत बॉलिवूडचा दादा जॉकी श्रॉफ, अनुपम खेर आणि डॅनी हे कलाकार दिसले होते. आरडी बर्मन, जावेद अख्तर यांच्याव्यतिरिक्त मनोहरी सिंग आणि बबलू चक्रवती यांनी चित्रपटातील गीतांना सजवले होते. या चित्रपटातील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत.