नव्या वर्षाचा पहिला दिवस जसा खूप आशा- अपेक्षा घेऊन येणारा असतो तसाच बॉलिवूडकरांनाही जानेवारी महिन्याकडून फार अपेक्षा आहेत. बी-टाऊनसाठी २०१७ हे वर्ष फारसं काही चांगलं नव्हतं. अनेक चांगले सिनेमेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले नव्हते. पण झालं गेलं मागे सारत बॉलिवूडने या वर्षाची जोशात तयारी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. चला तर मग वर्षाच्या पहिल्या महिन्यात कोण कोणते सिनेमे प्रदर्शित होणार आहेत त्यावर एक नजर टाकू…

१९२१- नवीन वर्षाची सुरूवातच भयपटाने होणार आहे. विक्रम भट्ट दिग्दर्शित या सिनेमात करण कुंद्रा आणि झरीन खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. भट्ट कंपनीने आतापर्यंत अनेक भटपट दिले आहेत. ‘१९२०’ या भटपटाचाच हा पुढचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. येत्या ५ तारखेला हा सिनेमा प्रदर्शित होणार.

कालाकांडी- सैफ अली खान याची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाकडून सैफच्या फार अपेक्षा आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणे अपेक्षित होते. पण सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या आक्षेपामुळे सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आता हा सिनेमा १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

मुक्काबाझ- सिनेमाच्या शिर्षकावरुन हा सिनेमा वेगळ्या धाटणीचा असेल असेच साऱ्यांना वाटत आहे. ‘कालाकांडी’सोबत हा सिनेमाही १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘मुक्काबाझ’ सिनेमाची कथा बॉक्सिंग रिंगणात घडताना दिसते. या सिनेमात कुमार सिंग, जिमी शेरगील, राजेश तैलंग आणि रवी किशन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

निर्दोष आणि वोडका डायरीज्- अरबाज खानचा या वर्षातला ‘निर्दोष’ हा पहिला सिनेमा असेल. हा एक थ्रिलरपट आहे. पण प्रेक्षकांना उत्सुकता असेल ती के के मेनन, रायमा सेन आणि मंदिरा बेदी यांच्या ‘वोडका डायरीज्’ या सिनेमाची. ‘वोडका डायरीज्’ सिनेमाच्या टीझरवरुनच या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करेल असे वाटत आहे.

अय्यारी- सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज बाजपैयी यांच्या मुख्य भूमिका असलेला सिनेमा प्रजासत्ताक दिनादिवशी २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

पॅडमॅन- बॉलिवूडला डबगाईतून वाचवायला पुन्हा एकदा खिलाडी कुमार पुढे सरसावला आहे. जानेवारीत सगळ्यात जास्त उत्सुकता कोणत्या सिनेमाची असेल तर तो सिनेमा म्हणजे ‘पॅडमॅन’. अरुणाचलम मुरुगनाथम यांनी ग्रामीण भागातील महिलांनी पाळीच्या दिवसांमध्ये वापरायचे सॅनिटरी पॅड वापरावेत, यासाठी चळवळ सुरू केली होती. सिनेमात अक्षय कुमार अरूणाचलम मरुगनाथम यांची भूमिका साकारत आहे.