वर्षांतून असे काही मोजकेच चित्रपट येतात जे देशभरात सगळीकडे चांगली कमाई करतात, खऱ्या अर्थाने लोकप्रिय चित्रपट ठरतात. यावर्षी ‘बाहुबली २’ने हा मान पटकावला. तब्बल दोन आठवडे या चित्रपटाने तिकीटबारीवर जे काही बळ दाखवून दिले आहे त्याचा आकडा गाठणं हे बॉलीवूडच्या खान मंडळींसाठी आव्हानच ठरणार आहे. दोन आठवडे ‘बाहुबली २’च्या बळामुळे दडून बसलेल्या बॉलीवूडची गाडी आता रुळावर आली आहे. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सरकार ३’ आणि अक्षय रॉय दिग्दर्शित ‘मेरी प्यारी बिंदु’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दोन वेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रेक्षकांसमोर असल्याने नक्कीच ‘बाहुबली’चे गारुड मनावरून उतरायला मदत होईल आणि प्रेक्षक पुन्हा बॉलीवूड वळणावर स्थिरावतील..

मेरी प्यारी बिंदु

‘यशराज प्रॉडक्शन’चा सर्वेसर्वा आदित्य चोप्रा आणि त्याचा मित्र मनीष शर्मा यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘मेरी प्यारी बिंदु’ हा चित्रपट नवोदित अक्षय रॉय याने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा वरवर पाहता प्रेमकथा आहे. प्रथितयश लेखक बनण्यासाठी धडपडणाऱ्या अभिमन्यू रॉय याची धडपड या चित्रपटात दिसणार आहे. चांगली बेस्टसेलर ठरेल अशी कादंबरी लिहिण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर अभिमन्यू आपल्या मूळ गावी कोलकात्यात परततो. इथे नव्याने लिखाणाची मांडणी करताना तो ‘बिंदू’चा आधार घेतो. ही बिंदु नेमकी कोण? लेखकाची कल्पना की खरेच त्याच्या आयुष्यात असलेल्या एका बिंदुची कथा.. या प्रश्नाचे उत्तर चित्रपटात मिळेल. या चित्रपटातून परिणीती चोप्रा बऱ्याच काळानंतर पडद्यावर पूर्ण लांबीच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुषमान खुराणा आणि तिची जोडीही यानिमित्ताने पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र आली आहे.

सरकार ३

सुभाष नागरे म्हणजेच ‘सरकार’ची तिसऱ्या भागातली कथा पडद्यावर आणण्यासाठी दिग्दर्शक रामगोपाल वर्माला अंमळ उशीरच झाला आहे. आत्तापर्यंत चित्रपट म्हणून ‘सरकार’चा लोकांच्या मनावरचा प्रभाव कमी झाला असला तरी अमिताभ बच्चन यांना त्या भूमिकेत पाहण्यासाठीची उत्सुकता हे एक कारण लोकांना या चित्रपटापर्यंत आणू शकते. ‘सरकार ३’मध्ये नावाप्रमाणे त्यांची तिसरी पिढी कथेत आहे. ‘सरकार’चा नातू शिवाजी नागरे (अमित साध) यात कें द्रस्थानी आहे. मात्र आधीच्या चित्रपटांप्रमाणेच इथेही ‘सरकार’ची लढाई एकाकीच आहे. ‘सरकार’ विरुद्ध घरातील अंतर्गत बंडाळी नातवाच्या रूपाने आणि मग तीन-तीन तऱ्हेवाईक राजकारणी ज्यांची भूमिका रोनित रॉय, जॅकी श्रॉफ आणि मनोज वाजपेयी यांनी केल्या आहेत. त्यांच्याबरोबरचा ‘सरकार’चा संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.