बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई विषयी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सतत मत मांडणाऱ्या कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावले होते. तसेच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिने परत मुंबईत येऊ नये असे ते म्हणाल्याचे कंगनाने सांगितले. पण त्यांना प्रत्युत्तर देत कंगनाने ट्विटमध्ये मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे वाटते का? असे म्हटले. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. आता कंगनाच्या या वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने संतपा व्यक्त केला आहे.

उर्मिलाने ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्र हा भारताचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे… छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे… मुंबईने लाखो भारतीयांना नाव, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळवून दिली. पण केवळ कृतघ्न लोकंच मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करु शकतात. हे खूप धक्कादायक आणि कधीही न पटणारे आहे’ या आशयाचे ट्विट करत उर्मिलाने कंगनावर टीका केली आहे. त्याचबरोबर तिने ट्विटमध्ये आमची मुंबई, मुंबई मेरी जान, जय महाराष्ट्र असे म्हटले आहे.

आणखी वाचा- “ताई, राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा”, सुबोध भावेने कंगना रणौतला सुनावलं

आणखी वाचा- मुंबईवरुन निर्माण झालेला नेमका वाद काय आणि कंगनाविरोधात संताप का व्यक्त होतोय?

बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी देखील कंगनाच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. त्यामध्ये स्वरा भास्कर, रितेश देशमुख, रेणुका शहाणे, सोनू सूद, दिया मिर्झा अशा अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.

काय होतं कंगनाचे ट्विट?
“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं कंगना म्हणाली होती.