अनिल शर्मा दिग्दर्शित ‘सिंह साहब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी उर्वशी रौतेला तिच्या फिटनेसविषयी सतर्क असल्याचं अनेक वेळा दिसून आलं आहे. उर्वशीने सोशल मिडीयावर तिच्या फिटनेसचे किंवा जिममध्ये घाम गाळतांनाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती तिच्या फिटनेसबाबत किती जागृत आहे हे वारंवार दिसून येते. उर्वशी शेअर करत असलेल्या प्रत्येक फोटोवर किंवा व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडत असतो. त्यामुळे तिने पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

बॉलिवूडची ‘फिटनेस क्वीन’ उर्वशीने सध्या एका डान्सचा व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ती बेली डान्स करताना दिसून येत आहे. उर्वशीच्या डान्सचा हा व्हिडिओ सध्या वा-या सारखा सोशल मिडीयावर व्हायरल होत असून आतापर्यंत त्याला ६ लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये उर्वशी प्रत्येक डान्सस्टेप नजाकततेने करत असून या व्हिडिओमधून तिच्यातील उत्तम नर्तकीचे दर्शन होत आहे. हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीत उतरत असून काहींनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे.

दरम्यान, ‘फिटनेस क्वीन’ म्हणून ओळखली जाणा-या उर्वशीला ‘हेट स्टोरी ४’ या चित्रपटामुळे ख-या अर्थाने ओळख मिळाली. त्यानंतर तिच्या व्हायरल फोटोज, व्हिडिओजमुळे ती सतत प्रकाशझोतात राहू लागली. काही दिवसापूर्वी तिने वेट लिफ्टिंग करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओला देखील कमालीचे लाईक्स मिळाले होते.