01 October 2020

News Flash

ऑनलाइन आशयावर नियंत्रण ठेवणे गरजेचे – वंदना गुप्ते

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवे दिग्दर्शक नवीन विषय घेऊन येत आहेत.

|| रेश्मा राईकवार

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवे दिग्दर्शक नवीन विषय घेऊन येत आहेत. त्याचबरोबरीने ज्येष्ठ अनुभवी कलाकारांना आशयसंपन्न, प्रयोगशील भूमिकांमधून लोकांसमोर आणण्याचाही प्रयत्नही केला जातो आहे. गेल्या दोन वर्षांत लागोपाठ वेगळ्या भूमिकांमधून समोर आलेले अभिनेता मोहन जोशी आणि ज्यांच्यासाठी काही भूमिका खास लिहिल्या जातात अशा अभिनेत्री वंदना गुप्ते ही जोडी ‘६६ सदाशिव’ या चित्रपटातून लोकांसमोर येते आहे. यानिमित्ताने, आत्ताचे दिग्दर्शक, त्यांचे विषय, बदलती माध्यमे यांच्याविषयी या दोन्ही कलाकारांशी साधलेला संवाद..

ऑनलाइन वेबसीरिज, शोज यांचा अतिरेक होतो आहे, असं मला वाटतं. या नव्या माध्यमामुळे कलाकारांना मरण नाही, त्यांना यामुळे काम करायची संधी मिळते आहे. पण या ऑनलाइन आशयावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. लैंगिकता दाखवल्याशिवाय चित्रपट किंवा कुठलीही कथा पूर्ण होत नाही, अशा प्रकारचे ठोकताळे मांडून केलेल्या या वेबसीरिजमुळे खूप चुकीचा आशय वेगाने लोकांपर्यंत पोहोचतो आहे. एकीकडे आपण प्रेक्षकांना सुसंस्कृत, सुजाण केलं असं म्हणत असलो तरी हे माध्यम सध्या लहान मुलांच्या आणि त्याहीपेक्षा वयात येणाऱ्या मुलांच्या हातात आहे. त्यांच्याकडे हा आशय थेट पोहोचतो. ऑनलाइनपेक्षा टीव्हीचा आशय बरा वाटतो, कारण त्यावर आजही काही प्रमाणात नियंत्रण आहे. ज्या वेगाने आणि पद्धतीने या माध्यमावरचा आशय सगळीकडे पसरतो आहे, त्यावर खरोखरच गांभिर्याने विचार व्हायला हवा, असं वाटत असल्याचं वंदना गुप्ते यांनी स्पष्ट केलं.

गेली कित्येक वर्षे मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर कामाचा अनुभव घेतल्यानंतर आता या नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करतानाचा अनुभव खूप वेगळा असल्याचं त्या म्हणतात. नवीन मुलांचं कौतुक इतक्यासाठीच वाटतं की त्यांचं कागदावरचं काम चोख असतं. मुळातच ही मंडळी अभ्यास करून या क्षेत्रात उतरतात. त्यांना तंत्राची चांगली जाण आणि विषयाची समज आहे. त्यामुळे आमच्या अनुभवाचा फायदा त्यांना जसा होतो, तसंच त्यांच्या हुशारीचा-अभ्यासाचा फायदा आम्हालाही होतो, असं त्या म्हणतात. त्यांचे चित्रपट हे कधी तरी थोडेसे पुस्तकी वाटत असले तरी ते अभ्यासू पद्धतीने मांडलेले असतात. दुसरं म्हणजे पूर्वी वेगळे विषय हाताळायला लोक घाबरायचे, आत्ताची ही मंडळी बेधडकपणे विषय मांडतात, त्याचं खूप कौतुक वाटतं, असं त्या म्हणतात.

योगेश देशपांडे दिग्दर्शित ‘६६ सदाशिव’ या चित्रपटात त्या मुख्य भूमिका करत आहेत. त्याबद्दल सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या, मला कायम असं वाटत आलं आहे की आपल्याला संभाषण कला अवगत असली पाहिजे. त्यासाठी तुमचं भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे, वाचन चौफैर असलं पाहिजे तरच तुम्ही संभाषण कलेत पारंगत होऊ शकता. आणि मी यात कमी पडते असं मला वाटायचं. त्यासाठी मी प्रयत्न करत राहिले. त्याच विषयावर जेव्हा मला योगेशने चित्रपट करण्याविषयी विचारलं तेव्हा मला आनंद झाला. ६६ व्या कलेची ही कल्पना सुचणंच इतकं भन्नाट आहे की मी त्यानेच प्रभावित झाले. दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी पूर्ण बांधेसूद पटकथा हातात ठेवली, असं कधीच अनुभवायला मिळत नाही. त्याची कल्पना आणि विषय त्याच्या डोक्यात इतकी मुरलेली होती, त्याचं नियोजनही चोख होतं. त्यामुळे मला मनापासून चित्रपट आवडला. पुण्याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत, मात्र तिथले लोक मुळात हुशार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. योगेशने या विषयासाठी खूप संशोधन केलं आहे. कधी तरी लहानपणी त्याने वपुंच्या कथेतून या कल्पनेबद्दल ऐकलं होतं. त्याच्यावर जेव्हा खरोखरच चित्रपट करता येईल, असं वाटलं तेव्हा त्याने त्याचा पूर्ण अभ्यास केला. एवढंच नाही तर कलाकार म्हणून आम्हाला मोकळीकही दिली. आमच्या अनुभवाचा वापर करून आम्हाला आमची भूमिका फुलवायला दिली. अनुभव आणि नवशिकेपणा एकत्र येऊन ही कलाकृती झाली आहे.

ऑनलाइन आशयामुळे कलाकारांना नवीन संधी मिळत असली तरी हे माध्यम फार वेगाने सर्वदूर पसरलं आहे, त्याच्या आशयावर काहीएक नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.    – वंदना गुप्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 12:24 am

Web Title: vandana gupte
Next Stories
1 अशा प्रकारच्या भूमिका मिळणे हा आनंदायी अनुभव – मोहन जोशी
2 सिंहावलोकन!
3 विषय चांगला, पण..
Just Now!
X