चित्रपटसृष्टीत कोणताही कलाकार त्याच्या वाटणीला आलेली भूमिका निभावण्यासाठी बरीच मेहनत घेतो. सध्याच्या घडीला अशा कलाकारांच्या यादीत अभिनेता वरुण धवनच्या नावाचाही समावेश झाला आहे. काही वर्षांपूर्वीच कलाविश्वात पदार्पण केलेल्या वरुणच्या खासगी आयुष्याविषयीच्या सर्व चर्चा आता शमल्या असून पुन्हा एकदा त्याच्या चित्रपट कारकिर्दीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सध्या तो ‘ऑक्टोबर’ या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेत असून त्यातील भूमिकेसाठी तो शक्य त्या सर्व परिने मेहनत घेताना दिसतोय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटातील भूमिकेशी एकरुप होण्यासाठी त्याने बऱ्याच गोष्टींचा त्याग केला आहे. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे झोप. दररोज कमीत कमी आठ तासांची झोप ही गरजेची असते. पण, वरुणला मात्र तब्बल सात दिवस न झोपण्याचे आदेश मिळाले होते. चित्रपटातील काही दृश्यांमध्ये वरुण चिंताग्रस्त असल्याचे दाखवायचे असल्यामुळेच दिग्दर्शक सूजीत सरकारने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

वास्तवदर्शी कथानक मोठ्या प्रभावीपणे साकारण्यासाठी सूजीत ओळखला जातो. आपली हीच ओळख कायम ठेवत चित्रपटात कोणताही कृत्रिमपणा न आणत सूजीतने वरुणला आठवडाभर झोपूच न देण्याचे ठरवले होते. पण, अखेर त्याला दिवसातील काही वेळच झोपण्याची परवानगी मिळाली. दिग्दर्शकाची मागणी होती अगदी त्याचप्रमाणे वागत वरुणनेही कोणतीही तक्रार न करता चित्रपटाची गरज जाणत या सर्व गोष्टी करण्यास होकार दिला.

वाचा : आईच्या निधनानंतर जान्हवी पहिल्यांदाच कॅमेरासमोर

चित्रपटातील एका दृश्यासाठी आपण अनेकदा कलाकारांना असं काहीतरी करायला सांगतो असं सूजीतने स्पष्ट केलं. ‘चित्रपटातील काही दृश्यांमध्ये वरुणला भावनिकरित्या तुटलेल्या व्यक्तीच्या रुपात दाखवायचं होतं. त्याच्या अभिनयातून एक वेगळ्याच प्रकारची निराशा दिसण्याची गरज होती. आवाजातूनही एक प्रकारचा थकवा जाणवणं अपेक्षित होतं, त्यामुळे त्याला दृश्यं चित्रीत करण्यापूर्वी झोपण्याचा सल्लाही दिला होता.

सूजीत सरकारचा ‘ऑक्टोबर’ हा एक रोमॅण्टिक चित्रपट असून पुढच्याच आठवड्यात त्याचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. रोनी लाहिरी आणि शील कुमार निर्मित या चित्रपटात वरुण आणि अभिनेत्री बानिता संधू मुख्य भूमिकेत आहेत. १३ एप्रिल रोजी ‘ऑक्टोबर’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.