करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग सध्या त्रस्त आहे. लोक आपल्या घरातच कैद झाले आहेत. लॉकडाउनमुळे सिनेउद्योग तर पार ठप्पच झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण जगात एकही नवा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. परिणामी चित्रपटगृह देखील ओसाड पडली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘वेनम २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाचे नाव देखील आता बदलण्यात आले आहे.

‘वेमन’ हा एक सुपरहिरो चित्रपट आहे. येत्या ऑक्टोंबर महिन्यात हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित होणार होता. परंतु करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे आता थेट पुढच्या वर्षी २५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचं नाव आता ‘वेमम: द लेट देअर बी कॉर्नेज’ असं ठेवण्यात आले आहे. वेनमसोबतच ‘बॅटमॅन’, ‘वंडर वुमन १९८४’, ‘फलॅश पॉईंट’, ‘ब्लॅक अॅडम’ आणि ‘शेजॅम २’ हे सुपरहिरो चित्रपट देखील पुढे ढकलण्यात आले आहेत.

खरं तर ‘वेनम’ ही स्पायडरमॅन युनिव्हर्समधील एक खलनायक व्यक्तिरेखा आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडरमॅन ३’ या चित्रपटामधून तो पहिल्यांदा खलनायक म्हणून प्रेक्षकांसमोर आला होता. परंतु २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या वेनम या स्टँड अलोन चित्रपटामुळे या खलनायकाला अँटी सुपरहिरोचा टॅग मिळाला. हा चित्रपट इतका सुपरहिट झाला की प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता याचा दुसरा भाग प्रदर्शित केला जाणार आहे.