चित्रपटसृष्टीत हाताच्या बोटावर मोजता येतील अशा मंडळींशीच माझी जवळीक आणि मैत्री आहे. त्या मंडळींत ओमचे नाव अग्रभागी होते. अलीकडच्या काही महिन्यांत आमच्या भेटीगाठी फारशा होत नसल्या तरी जेव्हा कधी भेटायचो किंवा दूरध्वनीवर बोलायचो तेव्हा मात्र भरभरून गप्पा व्हायच्या. प्रायोगिक नाटक, समांतर आणि व्यावसायिक चित्रपट अशा तीनही ठिकाणी त्याने आपल्या अभिनयाची स्वतंत्र नाममुद्रा उमटविली. व्यावसायिक चित्रपटांना त्याने कधीही कमी लेखले नाही. ओमचे खास वैशिष्टय़ म्हणजे भूमिका कोणतीही असो तो ती भूमिका प्रत्यक्ष जगायचा. त्या भूमिकेत नखशिखांत शिरून ती स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात पुरेपूर भिनवायचा. त्या भूमिकेची लकब, पेहराव, संवाद सर्व बारकावे तो चाणाक्षपणे टिपून त्याचा योग्य वापर ती भूमिका साकार करताना करायचा. त्यामुळे त्याच्या वाटय़ाला आलेली प्रत्येक भूमिका त्याने जीव ओतून अप्रतिम साकारली..

माझ्या आत्मचरित्राच्या (सय) प्रकाशन सोहळ्यास नसिरुद्दीन शहा आणि ओम या दोघांनाही प्रमुख पाहुणा व अध्यक्ष म्हणून बोलाविले होते. त्या सुमारास ओमचे मुंबईबाहेर चित्रीकरण होते, पण तरीही त्याने कार्यक्रमास मी येणारच असे सांगितले.  दरम्यानच्या काळात ओमने केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त विधानामुळे प्रसारमाध्यमे तसेच समाजमाध्यमांतूनही त्याच्यावर मोठय़ा प्रमाणात टीका झाली. लोकांच्याही रोषाला त्याला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत ओम या कार्यक्रमाला आला तर काही राजकीय पक्ष किंवा संघटनांकडून कार्यक्रम उधळला जाण्याची भीती होती. माझ्याही मनात मोठी धाकधूक असल्याने मी त्याला दूरध्वनी करून या परिस्थितीत तू कार्यक्रमाला येऊ नये असे मला वाटत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यावर त्यानेही कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागायला नको असे सांगून मी न आलेलेच बरे, असे मोकळेपणाने मान्य केले. तसेच ‘ते’ वादग्रस्त विधान करायला नको होते. त्याचा आता मला पश्चात्ताप होत असून घडल्या प्रकाराबाबत संबंधितांकडे तसेच प्रसारमाध्यमातून मी माफी मागितली असल्याचे त्याने त्या वेळी सांगितले. त्याचे आणि माझे झालेले ते शेवटचे बोलणे. आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला, पण काही कारणाने का होईना ओम मात्र येऊ शकला नाही ही रुखरुख माझ्या मनात आता कायम राहील.

ओम राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचा (एनएसडी) विद्यार्थी. मी दिल्लीला कायमचा रामराम करून नाटक आणि चित्रपटांत काही तरी करायचे म्हणून मुंबईत आले. मुंबईत मी ओमबरोबर ‘वासनाकांड’ हे हिंदी नाटक केले. महेश एलकुंचवार यांच्या मूळ मराठी नाटकाचा तो हिंदी अनुवाद होता. नाटकात अवघ्या दोनच भूमिका आणि त्या ओम आणि स्मिता पाटील यांनी साकारल्या. नाटकाला आमच्या तिघांचेच आर्थिक पाठबळ होते. आम्ही तिघेही तेव्हा नवोदितच होतो. ‘एनसीपीए’च्या प्रायोगिक रंगमंचावर त्याचा प्रयोग झाला. मात्र तो पहिला आणि शेवटचाच. ओम आणि स्मिता दोघांनीही अगदी जीव ओतून काम केले. नाटकाचा प्रयोगही देखणा व खूप छान झाला. दुर्दैवाने नाटकासाठी आमच्या तिघांचे आर्थिक पाठबळ कमी पडले आणि पुढे प्रयोग होऊ शकले नाहीत. ओमबरोबर मी केलेले ते एकमात्र व शेवटचे नाटक ठरले.

ओमसह मी ‘बेगार’, ‘स्पर्श’, आणि ‘दिशा’ असे तीन चित्रपट केले. तीनही चित्रपटांतील त्याच्या भूमिका त्याने उत्कृष्ट  साकारल्या. शंकरराव खरात यांच्या कथेवर आधारित ‘बेगार’ची पटकथा दिलीप पाडगावकर यांची होती. आज आता ते दोघेही राहिले नाहीत. ‘बेगार’ माझी आणि ओमची पहिली टेलिफिल्म. अरुण जोगळेकर, मीरा रानडे हे कलाकारही यात होते. मागास जातीतील एका अशिक्षित माणसाची मुख्य भूमिका ओमने साकारली होती. या माणसाला एक पत्र येते. त्यात काय लिहिले आहे हे वाचून दाखविण्यासाठी तो गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीकडे जातो. हे पत्र मी वाचतोच रे, असे साळसूदपणे सांगून त्या अगोदर माझी काही कामे तू कर, त्यानंतरच हे पत्र वाचून दाखवेन असे ती व्यक्ती त्याला सांगते. यातील एक काम असते ते एका मोठय़ा पडक्या विहिरीत वाढलेल्या वडाच्या झाडाच्या पारंब्या आणि झाडाची मुळे कापण्याचे. ओम धोतराचा काचा मारून आणि हातात कोयता घेऊन त्या विहिरीत उतरला. प्रसंगाचे चित्रीकरण सुरू झाले. अचानक घायकुतीला येऊन, सई माझी पकड ढिली होत चालली आहे, हात केव्हाही निसटेल, असे ओम जोरात ओरडला आणि धपकन त्या प्रचंड विहिरीच्या काळ्याशार पाण्यात पडला. त्याने गटांगळ्या खायला सुरुवात केली. मला पोहता येत नाही हे त्या पठ्ठय़ाने अगोदर सांगितलेही नव्हते. आता काय करायचे ते कळेना. आम्ही सगळेच अक्षरश: हवालदिल झालो. सुदैवाने युनिटमधील एकाने आमच्या बसवरून एक मोठा दोरखंड आणला आणि विहिरीत सोडून त्याच्या आधारे ओमला वर खेचून काढले. ओम सुखरूप वरती येईपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता.

असाच एककिस्सा ‘स्पर्श’ चित्रपटाच्या वेळेचा. बासू भट्टाचार्य निर्मित या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्ली येथे झाले. एका बंगल्यात माझ्यासह ओम, कॅमेरामन, साऊंड टेक्निशियन आणि आणखी एकाची निवासाची सोय केली होती. बंगल्यातील शीतकपाटात (फ्रीज) प्राण तलवार यांनी खास डेन्मार्कहून माझ्यासाठी आणलेले दुर्मीळ ‘ब्ल्यू चीज’ मी ठेवले होते. या ‘चीज’ला इतकी दरुगधी येते की त्याला न धुतलेल्या मोज्याचीच उपमा दिली जाते. ओम व त्या सगळ्यांनी, ‘फ्रीजमध्ये ठेवलेले ते चीज तात्काळ हलविण्यात आले नाही तर आम्ही सगळे हा बंगला व त्याचबरोबर हा चित्रपट सोडून जाऊ,’ असे पत्र मला लिहिले. मग काय ‘त्या’ चीजची अर्थातच उचलबांगडी झाली.

‘दिशा’ चित्रपटात त्याने ‘परशुराम’ (येडा परशा) ही एका पिसाट माणसाची भूमिका रंगविली होती. सतत आठ वर्षे मेहनत घेऊन एकटय़ाच्या बळावर जिद्दीने विहीर खणणाऱ्या माणसाची ही कथा. चित्रीकरणापूर्वी ओमला घेऊन ती जागा पाहायला आम्ही गेलो. एक मोठी खाण आम्ही ती विहीर म्हणून दाखविणार होतो. प्रत्यक्ष त्या जागेवर गेल्यानंतर ती प्रचंड खोल विहीर पाहून ‘बाप रे पुन्हा एकदा विहीर. सई तुझ्या मनात आहे तरी काय? अगं बाई मला विहिरीत लोटायचाच तू चंग बांधला आहेस का?’ असा मिश्कील सवाल त्याने मला केला होता.

भारदस्त आवाजाची दैवी देणगीही त्याला लाभली होती. भूमिकेसाठी त्याचाही त्याने उपयोग केला. हाती घेतलेल्या कामाप्रती त्याची सदैव निष्ठा असायची. ओमचा स्वभाव मनमोकळा, मनमिळाऊ होता. सेटवरही तो सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचा. अशा या गुणी कलाकारासोबत जास्त काम करता आले नाही याची खंत वाटते.

सई परांजपे, ज्येष्ठ निर्मात्या व दिग्दर्शिका

(शब्दांकन- शेखर जोशी)