24 April 2019

News Flash

अभिनेत्री, लेखिका ते उद्योजिका लालन सारंग यांचा जीवनप्रवास

'आजपर्यंत जे मिळाले त्यात आनंदी व कृतार्थ आहे. शेवटी माणसाने मोह तरी किती करायचा? त्यालाही काही मर्यादा आहेच ना? '

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या.

मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेल्या ‘त्या’ अभिनेत्रीला खरे तर ‘अभिनय’ करायचाच नव्हता. शिक्षण, नोकरी, लग्न आणि संसार यातच रमायचे होते. पण रंगभूमीकडे त्या ओढल्या गेल्या, तिथे रमल्या आणि विविध नाटके व भूमिकांतून त्यांनी रंगभूमीवर स्वत:ची स्वतंत्र नाममुद्रा उमटविली. काही नाटकांमुळे रंगभूमीवरील ‘बंडखोर’अभिनेत्री अशी ओळखही त्यांना मिळाली. अभिनयापासून सुरू झालेला ज्यांचा प्रवास लेखिका, एकपात्री कार्यक्रम सादरकर्त्यां ते हॉटेल व्यावासायिक, उद्योजिका असा झाला.

लालन सारंग यांच्या अभिनय प्रवासात ‘सखाराम बाईंडर’ नाटक मैलाचा दगड ठरले. या नाटकातील त्यांनी साकारलेली ‘चंपा’ ही भूमिका कलाकार म्हणून त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतीच, पण ती जगण्याचे नवे भान देणारी होती. स्वत:चे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदलून गावंढळ, रांगडी आणि बिनधास्त ‘चंपा’ साकारणे हे एक आव्हान होते आणि ते त्यांनी यशस्वीपणे पेलले. साहजिकच गप्पांची सुरुवात ‘सखाराम बाईंडर’पासूनच झाली. त्या आठवणींचा पट उलगडताना त्या म्हणाल्या, ‘चंपा’च्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध सुरू होता. काही नावे पुढे येत होती पण कोणत्याच नावावर शिक्कामोर्तब होत नव्हते. माझ्या परिचयाच्या डॉ. कुमुद मेहता यांनी माझे नाव नाटकाचे लेखक विजय तेंडुलकर व दिग्दर्शक आणि माझा नवरा कमलाकर यांना सुचवले. तेव्हा पहिली प्रतिक्रिया ‘या भूमिकेसाठी लालन शोभणार नाही’ अशीच होती. पण ‘चंपा’साठी माझी निवड झाली, ‘चंपा’ साकारली आणि एका रात्रीत माझे आयुष्य बदलून गेले. चंपाची गावंढळ भाषा, तिची आठवारी साडी, केळं काढून सहावारी साडी नेसणे, तिची केशरचना, कपाळावरील मोठ्ठे कुंकू, हनुवटीवरील गोंदण, डोक्यावरून घेतलेला पदर सारखा घसरत असल्याने तो डाव्या हाताने सावरून पुन्हा डोक्यावर घेणे, रंगमंचावर साडी बदलणे आणि स्वत:च्या मस्तीत रंगभूमीवर वावरणे हे सगळे ‘चंपा’च्या भूमिकेत आणले आणि मी ‘चंपा’ जिवंत केली.

खरे नाटय़ तर त्यानंतरच घडले. नाटकाचे जेमतेम १३ प्रयोग झाले आणि हे नाटक अश्लील आहे अशी ओरड झाली. नाटकात काही ‘कट’ सुचविण्यात आले व नाटकावर बंदी आली. तेंडुलकर, सारंग यांनी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात लढा दिला. त्याची परिणीती म्हणून सहा महिन्यांनंतर कोणताही ‘कट’ न मिळता उच्च न्यायालयाने ‘सखाराम बाईंडर’ची निर्दोष सुटका केली. पण त्या दरम्यानच्या काळात आम्हाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मी आणि कमलाकर आम्हा दोघांसाठीही तो कसोटीचा काळ होता. तेव्हा मी नोकरी सोडली होती. कमलाकरकडेही नोकरी नव्हती. पण त्या सगळ्या संघर्षांतून आम्ही तावूनसुलाखून बाहेर पडलो..

लालन सारंग या माहेरच्या पैंगणकर. एक भाऊ, सहा बहिणी आणि आई व वडील असे त्यांचे मध्यमवर्गीय कुटुंब. घरातील कोणीही अभिनय क्षेत्रात नव्हते. त्या गिरगावातील ‘राममोहन’ शाळेच्या विद्यार्थिनी. दस्तुरखुद्द लालन यांनीही आपण पुढे अभिनय क्षेत्रात येऊ अशी कल्पना केली नव्हती. शिक्षण, नोकरी, लग्न, संसार असे मध्यमवर्गीय साचेबद्ध चित्र त्यांनी डोळ्यासमोर ठेवले होते. सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एकीकडे खासगी कंपनीत नोकरी सुरू होती. पुढे मुंबईत कामगार आयुक्त कार्यालयातही त्यांनी काही काळ नोकरी केली. नोकरी करत असतानाच त्यांनी शिक्षणही पूर्ण केले. ‘बीए’ला असताना ‘आयएनटी’च्या स्पर्धेत महाविद्यालयाने सादर केलेल्या एका नाटकात त्यांनी काम केले. याचे दिग्दर्शन अरविंद देशपांडे यांचे होते. या नाटकामुळे कमलाकर सारंग यांच्याशी ओळख झाली. तेही सिद्धार्थ महाविद्यालयातच होते. पुढे स्पर्धेसाठीच ‘राणीचा बाग’ हे नाटक त्यांनी केले. त्या दिवसात सुरेश खरे, नंदकुमार रावते, कमलाकर सारंग असा त्यांचा मित्र परिवार होता. पुढे कमलाकर यांनी लालन यांना मागणी घातली आणि त्यांचा प्रेमविवाह झाला. घरचेही कमलाकर यांना ओळखत असल्याने घरूनही लग्नाला होकार मिळाला आणि त्यांचे शुभमंगल झाले. लग्न तर केले पण राहण्यासाठी स्वत:ची जागा नव्हती. घर म्हणजे विंचवाच्या पाठीवरचे बिऱ्हाड होते. सुरेश खरे यांनी तात्पुरती भाडय़ाची जागा मिळवून दिली आणि लालन-कमलाकर एका जागी स्थिर झाले. पुढे १९७२ मध्ये माहीमला ‘वन रूम’ची त्यांची स्वत:ची जागा झाली. सारंगांकडे कमलाकर हे मोठे असल्याने घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती. साहजिकच सारंगांकडील मोठी सून या नात्याने लालन यांनी सर्व जबाबदाऱ्या व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली.

सुरुवातीच्या नाटय़ प्रवासाबाबत त्यांनी सांगितले, मुंबई मराठी साहित्य संघ, अत्रे थिएटर्सच्या नाटकांमधून अभिनयास सुरुवात झाली. ‘मी मंत्री झालो’, ‘बुवा तेथे बाया’, ‘मोरूची मावशी’, उद्याचा संसार’ आदींचा त्यात समावेश होता. पुढे ‘सखाराम बाईंडर’ने तर इतिहास घडवला. त्यानंतर ‘रथचक्र’, ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘जंगली कबुतर’, ‘खोल खोल पाणी’, ‘घरटे आपुले छान’, ‘बेबी’, ‘सूर्यास्त’, ‘कालचक्र’ आदी नाटके त्यांनी केली. या अभिनय वाटचालीत त्यांना चांगली नाटके आणि भूमिका मिळत गेल्या. ‘रथचक्र’मधील ‘ब्राह्मण स्त्री’ तर अन्य नाटकातून विविध भूमिका त्यांनी साकारल्या. ‘अभिषेक’ व ‘कलारंजन’ या आपल्या घरच्या नाटय़संस्थांच्या माध्यमातूनही रंगभूमीवर काही नाटके सादर केली. ‘सामना’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आदी चित्रपट तसेच ‘रथचक्र’ ही हिंदी मालिकाही त्यांनी केली. पण नाटक हा त्यांचा खरा श्वास असल्याने तसेच त्यांचे व कमलाकर यांचेही नाटकाशीच जीवाभावाचे नाते होते. त्यामुळे पुढे चित्रपट व दूरदर्शन मालिका केल्या तरीही नाटक शेवटपर्यंत सोडले नाही. ‘कालचक्र’ हे त्यांनी केलेले शेवटचे नाटक. काही वर्षांनी मुंबई सोडून पुण्यात आल्यानंतर त्यांनी ‘लग्न’ तसेच अभिनेत्री दीपा श्रीराम यांच्यासोबत ‘स्वयम्’ हे नाटकही केले.

लालन यांना स्वयंपाक करण्याची आणि दुसऱ्यांना चांगले खाऊ-पिऊ घालायची पहिल्यापासून आवड होती. मात्र ही आवड हॉटेल व्यावसायिक बनण्यापर्यंत घेऊन जाईल असे त्यांनाही वाटले नव्हते. पण ते घडले. त्या म्हणाल्या, स्वयंपाकाची आवड असल्याने स्वयंपाक करणे, वेगवेगळे पदार्थ तयार करून परिचित, आप्त यांना खाऊ घालणे हे मनापासून करत होतेच. त्याचे भव्य स्वरूप म्हणजे पुण्यात सुरू केलेले आमचे हॉटेल. खरे तर हॉटेल सुरू करण्याची मूळ कल्पना माझा मुलगा राकेश याची. त्याच्या पुढाकाराने ती कल्पना साकार झाली. सुरुवातीची काही वर्षे मी स्वत: हॉटेल व्यवस्थापनात जातीने लक्ष घालत होते. आता वयोपरत्वे थोडे कमी केले आहे.

आजवरच्या अभिनय प्रवासात अमुक एखादी भूमिका करायची राहून गेली अशी खंत वाटते का? यावर त्या म्हणाल्या, खरे सांगू, मला तसे कधीही वाटले नाही. अमुक एखादी भूमिका मला मिळायला हवी होती, करायची राहून गेली किंवा अमुक एका अभिनेत्रीच्या जागी मी असते तर ती भूमिका अशी केली असती असा विचारच कधी मनात आला नाही. आजवरच्या अभिनय प्रवासात ज्या भूमिका माझ्या वाटय़ाला आल्या त्या जीव ओतून व प्रामाणिकपणे केल्या. आता या क्षेत्रापासून दूर झाले असले तरी आजही लोक मला ओळखतात, मान देतात आणि माझ्या भूमिकांच्या जुन्या आठवणी जागवितात हा माझ्यासाठी खरा आनंद व मानसिक आधार आहे.

‘नाटकांमागील नाटय़’, ‘मी आणि माझ्या भूमिका’, ‘जगले जशी’, ‘बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती’ ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. आजवरच्या अभिनय प्रवासाच्या वाटचालीचा आणि केलेल्या भूमिकांचा मागोवा घेणारा ‘मी आणि माझ्या भूमिका’ हा एकपात्री कार्यक्रमही त्यांनी सादर केला आहे. ग. दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकर स्मृती ‘गृहिणी सखी सचिव’, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या कोथरुड शाखेच्या ‘जीवनगौरव’ आदी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. २००६ मध्ये कणकवली येथे झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना मिळाला होता. मुलगा राकेश सारंग याच क्षेत्रात असून दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचा यशस्वी निर्माता-दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. माझी आई आणि कमलाकर यांना माझ्या संपूर्ण आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. वयाच्या ७७ व्या वर्षांत असलेल्या लालनताई आता वयोपरत्वे फारशा कुठे बाहेर पडत नाहीत. शरीर साथ देत असते तर आजही पुन्हा एकदा नाटक करण्याची त्यांची तयारी आणि जिद्द आहे. ‘देखल्या देवा दंडवत’ या वृत्तीची आणि एखाद्याच्या कर्तृत्वाला महत्त्व न देता त्याच्या वरवरच्या दिसण्याला जे महत्त्व दिले जाते याची त्यांना खंत वाटते. आयुष्यात जी जी भूमिका वाटय़ाला आली, मग ती नाटकातील असो किंवा प्रत्यक्ष जगण्यातील असो, ती प्रत्येक भूमिका आणि त्या अनुषंगाने येणारी कर्तव्ये व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे आणि जिद्दीने पार पाडल्या याचेही त्यांना मोठे समाधान आहे.

गेली ५० वर्षे आपण या क्षेत्रात असून आजवरच्या अभिनय प्रवासात आणि आयुष्याच्या टप्प्यावर आजपर्यंत जे मिळाले त्यात आनंदी व कृतार्थ आहे. शेवटी माणसाने मोह तरी किती करायचा? त्यालाही काही मर्यादा आहेच ना? हेच माझ्या जीवनाचे सार व तत्त्वज्ञान असल्याचे सांगून त्यांनी या गप्पांचा समारोप केला.

(सदर लेख हा २०१७ साली प्रकाशित करण्यात आलेल्या ‘पुनर्भेट’या सदरातून घेण्यात आला आहे. )

First Published on November 9, 2018 10:20 am

Web Title: veteran actress lalan sarang marathi industry journey