दर्जेदार अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत लौकिक प्राप्त करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रिमा. आपल्या अभिनयकौशल्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. मराठी सोबत हिंदी रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. अशा सर्वांच्याच लाडक्या रिमा यांनी गेल्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पण, त्यांचं अस्तित्व कलाकृतींच्या माध्यमातून आजही आपल्यामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, रिमा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. ‘होम स्वीट होम’ असं त्या चित्रपटाचं नाव असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन लेखक, अभिनेते हृषिकेश जोशी यांनी केले आहे.

घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरीही घर हे प्रत्येकाला हवं असतं, याच घराविषयी आणि घरातील नात्यांविषयी भाष्य करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ ची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि.यांची असून प्रोऍक्टिव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मीडिया प्रस्तुतकर्ता आहेत. हृषिकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत असलेल्या या ‘होम स्वीट होम’ या चित्रपटात रिमा यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. रिमा यांच्यासह मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका ‘होम स्वीट होम’ मध्ये आहेत. या चित्रपटाची एक झलक नुकतीच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये रिमा यांचा हसरा चेहरा पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

‘होम स्वीट होम’ ची कथा हृषिकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे, संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. नात्यांच्या रिडेव्हलपमेंटवर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

वाचा : मध्यंतरातील संवाद

रिमा यांना त्यांच्या आईकडून अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांनी ५०हून जास्त हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी बहुविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी प्रथम मराठी रंगभूमी आणि नंतर मराठी चित्रपटामधून आपली कला सादर केली. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना त्यांच्या अभिनय क्षमतेनेसर्वांचे लक्ष वेधून घेतले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू झाला. त्यांचे खरे नाव नयन भडभडे होते तर त्यांची आई मंदाकिनी भडभडे या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. हिंदी चित्रपटात रिमा लागू यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका सर्वात जास्त केल्या आहेत. पण त्यांच्या सर्वच भूमिका जबरदस्त गाजल्या आहेत.