‘राजी’, ‘उरी’, ‘संजू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करणारा विकी कौशल सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या ब्रेक-अप व लिंक-अपच्या खूप चर्चा झाल्या. पण आता त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल अभिनेत्री राधिका आपटेने मोठा खुलासा केला आहे. विकी एका तरुणीला डेट करत असल्याचं राधिकाने नुकत्याच एका चॅट शोमध्ये सांगितलं.
नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये राधिकाने हजेरी लावली होती. यावेळी नेहाने तिला विचारलं की बॉलिवूडमधल्या कोणत्या जोडीने एकत्र यावं असं तुला वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना राधिकाने विकी कौशलच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल अनपेक्षितपणे खुलासा केला. ‘विकी कौशल एका मुलीला डेट करत आहे. त्या दोघांनी एकत्र येण्याचा विचार करावा,’ असं ती म्हणाली. यावेळी राधिकाचा रोख अभिनेत्री मालविका मोहनन हिच्याकडे होता असं म्हटलं जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून विकी व मालविका यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे.
‘बियॉण्ड द क्लाऊड्स’ या चित्रपटात झळकलेली मालविका व विकी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. विकीचा भाऊ सनी कौशल व मालविकासुद्धा चांगले मित्र आहेत. विकी व सनी तिच्या घरी जेवणासाठीसुद्धा गेले होते. त्यामुळे अखेर विकीला त्याची गर्लफ्रेंड मिळाली आहे अशी जोरदार चर्चा आहे.
याआधी डान्सर हरलीन सेठी ही विकीची गर्लफ्रेंड होती. हरलीनसोबत ब्रेकअप होताच कतरिना कैफ व भूमी पेडणेकर यांच्यासोबत त्याचं नाव जोडलं गेलं.