भारताचे आठवे लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरु आहे. मात्र यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे ते या सिनेमात प्रमुख भूमिका करणाऱ्या विकी कौशलच्या फर्स्ट लूकच्या फोटोवरुन. माणेकशॉ यांच्या प्रसिद्ध फोटोप्रमाणेच पोज आणि पोषाख परिधान करुन असलेला विकीचा माणेकशॉ यांच्या भूमिकेतील फोटो व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे माणेकशॉ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच विकीचा हा लूक समोर आला आहे. ‘राजी’ फेम दिग्दर्शिका मेघना गुलजार माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

कोणत्याही युद्धात जय-पराजयाची निश्चिती होते ती, सेनापतींनी आखलेल्या युद्धनीतीवर. शत्रूची तयारी जोखून त्या अनुषंगाने मुत्सद्देगिरीने श्रेष्ठ युद्धनीती आखणारा सेनापती युद्धातील विजयावर शिक्कामोर्तब करत असतो. माणेकशॉ यांनी १९७१ मधील बांगलादेशच्या युद्धात निर्णायक विजय मिळवून सप्रमाण सिद्ध करून दाखविली. या युद्धात भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या माणेकशॉ यांच्या कामगिरीचा गौरव ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे ते पहिले फिल्ड मार्शल. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून होती. अखेर या सिनेमाशी संबंधित पहिला फोटो इंटरनेटवर झळकला आहे. या फोटोमध्ये अभिनेता विकी कौशल माणेकशॉ यांची भूमिका साकरताना दिसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये माणेकशॉ यांच्या प्रसिद्ध फोटोप्रमाणे विकी या फोटोमध्ये टेबलसमोर बसलेला दिसतो. भारतीय लष्कराचा पोषाख, तोंडावरील स्मितहास्य, मिशा असा विकीचा हा लूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. माणेकशॉ यांचा खरा फोटो आणि विकीचा हा फोटो यामाधील साधर्म्य पाहिल्यावर तुम्हाला हा सिनेमा आत्तापासूनच चर्चेत का आहे याचा अंदाज येईल. विकीने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘निर्भीड देशभक्ताची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाल्याबद्दल स्वत:चा खूप अभिमान वाटतोय तसेच मी भावूक झालो आहे. आज त्यांच्या स्मृतिदीनापासून मी एक नवीन सुरुवात करत आहे.’

मेघनाने या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंगकडे मेघनाने विचारणा केल्याची चर्चा होती. मात्र आज विकीनेच या सिनेमातील भूमिकेचा फोटो पोस्ट करुन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाचे निर्माती करणार आहे. २०२१ मध्ये या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असून सध्या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु आहे. चित्रपटातील काही भागामध्ये १९७१ सालच्या युद्धाचा काळ दर्शविला जाणार आहे. माणेकशॉ यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांचीही भेट घेण्याचा मेघना गुलजार यांचा विचार असल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.