बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता अमेरिकेहून परतल्यापासून चर्चेत आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप तिने एका मुलाखतीत केला. १० वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेची कलाविश्वात जोरदार चर्चा होत असतानाच आता एक व्हिडिओ समोर आला आहे. २००८ मध्ये तनुश्रीच्या कारवर हल्ला करण्यात आला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केलं असा आरोप तनुश्रीनं केला. नाना पाटेकर यांना आपण रोखले म्हणून त्यांनी संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला त्रास दिला. नाना इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शूटिंग संपवून मी घरी निघाले त्यावेळी माझ्या गाडीवर दगडफेक केली. कुटुंबियांना त्रास दिला. मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती असे गंभीर आरोप तिने केले.

वाचा : अभिनेता होण्यासाठी आयटी कंपनीची ऑफर धुडकावली- विकी कौशल 

तनुश्रीच्या गाडीला अनेकांनी घेराव घातला असून काहीजण गाडीची तोडफोड करताना या व्हिडिओत दिसत आहेत. तनुश्रीच्या कारवर हल्ला करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं जात आहे. एक व्यक्ती गाडीच्या टायरची हवा काढत आहे तर दुसरा छतावर उड्या मारत आहे. तनुश्रीच्या कारची काचसुद्धा हल्लेखोरांनी फोडली. हे सर्व घडत असताना तनुश्री आणि तिचा ड्राइव्हर गाडीमध्येच बसले होते.

१० वर्षांनंतर पुन्हा एकदा ही घटना समोर आल्यानंतर प्रियांका चोप्रा, ट्विंकल खन्ना, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, फरहान अख्तर, परिणिती चोप्रा, शिल्पा शेट्टी यांसारख्या कलाकारांनी तनुश्रीला पाठिंबा दिला आहे.