मुंबईत गर्दीतल्या ट्रेनमध्ये एकतर चढायला मिळणे हेच मुंबईकरांसाठी मोठी गोष्ट असते. त्यातही जर बसायला जागा मिळाली तर मग काय विचारुच नका. ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली तर दिवसाची सुरुवातच चांगलीच झाली असेच अनेकजण मानतात. याला अभिनेत्री विद्या बालनही काही अपवाद नव्हती.

पण गर्दीतल्या ट्रेनमध्येही जागा मिळवण्यासाठी विद्याकडे एक नामी शक्कल होती. ट्रेनमध्ये चढल्यावर ती गरोदर असल्याचे भासवायची. ज्यामुळे तिला बसायला जागा मिळायची. तर दुसरीकडे अनुपम खेरही दुसऱ्यांच्या लग्नातले जेवायला मिळावे यासाठी जर्मन माणूस बनून जायचे. ही गोष्टी कोणी तिसऱ्याने नाही तर खुद्द विद्या बालन आणि अनुपम खेर यांनी सांगितली आहे. मुलांना अभिनयाचे धडे देताना त्यांनी आपल्या आयुष्यातले काही किस्से शेअर केले.

मुंबईमध्ये शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात विद्या बालन आणि अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे दिले. यावेळी त्यांनी त्यांच्या भूतकाळतले काही किस्सेही विद्यार्थ्यांसमोर उघड केले. याच मुद्यावर विद्या बालनने सांगितले की, ती चर्चगेट ते चेंबूर या रेल्वेच्या प्रवासात ती गरोदर असल्याचा अभिनय करायची ज्यामुळे तिला बसायला जागा मिळेल.

तर अनुपम खेर यांना दुसऱ्यांच्या लग्नातले जेवायला फार आवडायचे म्हणून ते जर्मन नागरिकासारखे बनून त्या लग्ननाला जायचे. त्या अनोळखी लग्नात लोकं त्यांना जर्मन समजून त्यांची फार उठबसही करायचे. अभिनयाचे धडे घ्यायल्या आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले की, कोणत्याही व्यक्तिरेखेमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देता आले पाहिजे.

तसेच यावेळी अनुपम खेर यांनी सुरुवातीच्या काळात स्थानकावर रात्र काढावी लागली होती त्या आठवणींना उजाळा दिला तर विद्याने सुरुवातीच्या काळात कसे लहान- लहान भूमिका केल्या होत्या त्याबद्दलही सांगितले. दोघांनीही विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली.