‘इश्किया’, ‘द डर्ट्री पिक्चर’ आणि ‘कहानी’ या चित्रपटानंतर कलाविश्वामध्ये अभिनेत्री विद्या बालन हिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात विद्याचा अभिनय पाहून सर्वजण थक्क झाले.विशेष म्हणजे या चित्रपटानंतर झिरो फिगर या संकल्पनेला छेद देण्यास विद्या यशस्वी ठरली. त्यामुळे आज लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये विद्याचा आवर्जुन नाव घेतं जातं. मात्र, हे यश मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. एका मुलाखतीत तिने तिच्या संघर्षकाळातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यात एका घटनेमुळे तब्बल ६ महिने तिने तिचा चेहरा आरशात पाहिला नव्हता, असं ‘पिंकव्हिला’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

करिअरच्या सुरुवातीच्या काळा विद्याने एक मल्याळम चित्रपट साइन केला होता. मात्र, काही दिवसानंतर अचानक कोणतंही कारण न देता तिला त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. त्यामुळे विद्याच्या आई-वडिलांनी निर्मात्यांची भेट घेतली. मात्र, विद्या अभिनेत्री वाटतच नाही असं या निर्मात्यांनी सांगितलं.

“सुरुवातीच्या काळात मला अनेकदा नकार सहन करावा लागला. यामध्येच एका मल्याळम चित्रपटासाठी मला साइन करण्यात आलं होतं. मात्र, काही दिवसानंतर अचानकपणे कोणतंही कारण न देता मला त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. या प्रकारानंतर मला धक्का बसला होता. त्यामुळे माझ्या आई-वडिलांनी निर्मात्यांची भेट घेतली. यावेळी निर्मात्यांनी चित्रपटातील काही सीन त्यांना दाखवले. ‘हे पाहा आणि ही कोणत्या अॅगलने अभिनेत्री वाटते ते मला सांगा’, असं म्हटलं. या प्रकारानंतर मी पूर्णच उन्मळून पडले होते”, असं विद्या म्हणाली.

आणखी वाचा- एका वर्षात कपिल शर्मा भरतो कोटयवधींचा टॅक्स; आकडा वाचून व्हाल थक्क

पुढे ती म्हणते, “त्या घटनेनंतर जवळपास ६ महिने मी माझा चेहरा आरशात पाहिला नव्हता. मी सुंदर नाहीये. माझ्यात अभिनेत्रीप्रमाणे ग्लॅमरस नाहीये असंच मला सतत वाटायचं त्यामुळे मी आरशात पाहणं सोडून दिलं होतं.”

दरम्यान, सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करणारी विद्या आज कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘इश्किया’, ‘द डर्ट्री पिक्चर’,‘कहानी’, मिशन मंगल, शकुंतलादेवी अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं असून तिच्या भूमिका गाजल्या आहेत.