बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा ‘कमांडो ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. एकीकडे चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे ,तर दुसरीकडे त्यावर टीकादेखील करण्यात येत आहे. या चित्रपटातील एका सीनमुळे हा चित्रपट ट्रोलिंगचा शिकार झाला असून शिवसेना चित्रपट सेनेचे कार्याध्यक्ष आणि अभिनेता सुशांत शेलारने देखील नाराजी व्यक्त केली आहे. तसंच हा सीन चित्रपटातून वगळण्याची मागणीही केली आहे.

चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटातील एक सीन युट्यूबवर शेअर केला होता. या पाच मिनिटाच्या व्हिडीओमध्ये पहलवान एका शाळेतील मुलीचा स्कर्ट ओढतांना दिसत. पहेलवान हे कृत्य करत असताना अभिनेता विद्युतची एण्ट्री होते आणि तो हा प्रकार थांबवतो. मात्र शाळकरी मुलीवर होणाऱ्या लैंगिक शोषणाचे दृश्य चित्रपटात दाखवल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली असून अनेकांनी दिग्दर्शक, निर्मात्यांवर टीकास्त्र डागलं आहे. त्यातच सुशांतनेदेखील फेसबुकच्या माध्यमातून नाराजगी व्यक्त केली आहे.

“महाराष्ट्राला कुस्तीची फार मोठी परंपरा आहे. देशाला पहिले ऑलम्पिक पदकही पैलवान खाशाबा जाधव यांनीच मिळवून दिले. पहलवान हे महिलांच्या संरक्षणासाठी सदैव मदतीला धावून आले आहेत असे असतानाही ‘कमांडो ३ ‘ या चित्रपटात पहलवानांची प्रतिमा मलीन केली आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही हा प्रकार अत्यंत गंभीर असून हे दृश्य तत्काळ चित्रपटातून वगळण्यात यावे.
#सुशांत_शेलार
कार्याध्यक्ष- शिवसेना चित्रपट सेना”


दरम्यान, सुशांत शेलारने या चित्रपटातून हा सीन वगळण्याची मागणी केली आहे. ‘कमांडो ३’ हा चित्रपट कमांडो मालिकेतला अनुक्रमे तिसरा चित्रपट असून विद्युत जामवाल हा मुख्य भूमिकेत झळकला आहे. या चित्रपटात त्याच्या व्यतिरिक्त अदा शर्मा आणि गुलशन देवय्यादेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.