समस्त तरुणाईचा, किंबहुना प्रत्येक तरुण पिढीचा आवडता संगीतकार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला तर त्याचं उत्तर केवळ एकच असेल.. राहुलदेव बर्मन. त्याची गाणी म्हणजे तारुण्यातील रोमांच आणि सळसळता उत्साह.  किशोर आणि पंचमचं काँम्बिनेशन हा तर स्वतंत्र पुस्तकाचाच विषय. मात्र मंगेशकर भगिनींनी त्याच्या संगीतात दिलेलं योगदानही तितकंच लक्षणीय आहे. पंचम हा असा एकमेव संगीतकार आहे, ज्याने या दोन्ही बहिणींना एकाच वेळी उत्तमोत्तम गाणी दिली. पंचमने दोघींच्या आवाजाची ताकद ओळखून गाणी रचली. तो म्हणायचाच की, ‘लता डॉन ब्रॅडमन आहे तर आशा गॅरी सोबर्स’! १९७३ मध्ये ओ. पी. नय्यर आणि आशाचा सांगीतिक प्रवास संपला. ओपीनंतर आशाच्या आवाजाचा यथायोग्य वापर कोण करणार, असा प्रश्न तेव्हाच्या रसिकांना पडला असेल. पंचमने अगदी सहज या प्रश्नाची  असंख्य सुरेल व ठसकेबाज उत्तरं दिली. ग्रेट ओपींनी आशाच्या आवाजाला न्याय देणारी असंख्य उत्तमोत्तम गाणी दिली, मात्र ती एकाच स्टाइलची होती. पंचमने मात्र त्यापुढे जात आशासाठी ‘आओ ना गले लगाओ ना’ ते ‘मेरा कुछ सामान’ व्हाया ‘पियाबावरी’ अशी सर्व प्रकारची गाणी रचली. सत्तरच्या दशकात अनेक जुने संगीतकार बाजूला पडले, काळ बदलला, संगीताचे प्रवाह बदलले. गाण्यांतील गोडवा कमी होत असल्याने लताच्या मधाळ स्वरांवर अन्याय होईल, अशी भीती वाटत असतानाच पंचम सरसावला आणि त्याने ‘ना कोई उमंग है, रैना बिती जाए, बिती ना बितायी रैना, नाम गुम जाएगा, इस मोडसे जाते है, आजकल पांव जमींपर, ए री पवन, सावन के झुले पडे’ अशा अनेक अनवट रचना या स्वरसम्राज्ञीसाठी केल्या.  
‘१९४२ ए लव्ह स्टोरी’मधील गाण्यांच्या लोकप्रियतेमुळे पंचमला नवी उभारी मिळाली होती. दुर्दैवाने, हा सिनेमा प्रदíशत व्हायच्या आधीच म्हणजे ४ जानेवारी १९९४ ला तो गेला. तो आज असता तर येत्या २७  तारखेला पंच्याहत्तर वर्षांचा झाला असता.. हा हुकलेला ‘पंचामृतमहोत्सव’ डॉ. अजित देवल यांच्या ‘तिरकीट धा’ या संस्थेतर्फे मुंबईत रवींद्र नाटय़मंदिरात साजरा होत आहे. त्यानिमित्त २०, २७ आणि २८ जून या दिवशी विशेष कार्यक्रम होत आहेत. पारंपरिक आणि नावीन्यपूर्ण वाद्यांचा ताफा हे पंचमचं वैशिष्टय़, त्यामुळे यातील वीस तारखेचा कार्यक्रम तर केवळ इन्स्ट्रमेंटल आहे आणि पंचमच्या हजारो गाण्यांमध्ये ज्यांनी साथसंगत केली ते अनेक सहकारी यात कसब दाखवणार आहेत. यातील होमी मुल्ला, अमृतराव काटकर आणि रणजीत गजमेर या ज्येष्ठ वादकांनी या निमित्ताने खास ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी पंचमच्या आठवणी जागवल्या.  

मत्रत्वाच्या नात्याने वागवलं –  होमी मुल्ला
प्रसिद्ध वादक व्ही. बलसारा मला पंचमकडे घेऊन गेले. मला तेव्हा अँकाíडयन चांगलं वाजवता येत होतं, मात्र पंचमकडे केरसी लॉर्डसारखे दिग्गज अ‍ॅकॉर्डियनवादक असल्याने मी तालवाद्यांकडे वळलो. मारुती कीर यांनी मला बोंगो, डुग्गी अशी अनेक तालवाद्यं शिकवली. ‘चंदनका पलना’ या चित्रपटापासून अखेपर्यंत मी पंचमकडे शेकडो गाणी वाजवली. तो खराखुरा अष्टपलू संगीतकार होता, मात्र माणूस म्हणूनही तेवढाच मोठा होता. एवढा लोकप्रिय संगीतकार मात्र त्याने आम्हाला मित्रत्वाच्या नात्याने वागवलं. आम्ही वादक असूनही आमच्याशी बोलताना तो बडेजाव करत नसे. आमचं खाणं-पिणं सगळं एकत्रच होत असे. सहकाऱ्यांवर त्याचा किती विश्वास होता याचा एक किस्सा सांगतो. ‘सागर’मधील ‘यू ही गाते रहो’ या गाण्याच्या रेकॉìडगदरम्यान एका वादकाला कॅस्टनेट हे वाद्य (या वाद्यातून कर्रकट्ट कर्रकट्ट असा आवाज निघतो) वाजवता येत नव्हतं. पंचमने मला फर्मान सोडलं, ‘होमी, तू वाजव ते’. गम्मत म्हणजे त्यापूर्वी मी ते वाद्य कधी हातात धरलंही नव्हतं, मात्र हा ठाम. अखेर मी कावस लॉर्ड यांच्याकडून कॅस्टनेटची जुजबी माहिती घेतली आणि ते वाजवलंही. त्यावर पंचम खूप खूश झाला व म्हणाला, ‘माझी सगळी पोरं ऑलराऊंडर आहेत’.

अनमोल शाबासकी – अमृतराव काटकर
आमचे तबल्यातील गुरू मारुतीराव कीर हे पंचमच्या ऱ्हिदम सेक्शनचे प्रमुख. त्यांनीच मला पंचमकडे संधी दिली. ही गोष्ट अगदी ‘तिसरी मंझिल’च्याही आधीची आहे. तबल्यावर माझा चांगला हात असल्याने पंचमच्या प्रत्येक गाण्यात मी तबला वाजवला, मात्र त्यापलीकडे जाऊन पंचमने मला बाकी तालवाद्यंही शिकण्याची प्रेरणा दिली. आपल्या वादकांमधील गुण तो जाणून होता. ‘हम किसी से कम नहीं’ या कव्वालीचं म्युझिक अ‍ॅरेंजिंग करायचं होतं. त्यावेळी बासू आणि मनोहारी हे पंचमचे प्रमुख साहाय्यक नेमके परदेशात गेले होते. माझ्या ध्यानीमनी नसताना पंचमने मला ती कव्वाली अ‍ॅरेंज करायला सांगितली, थोडं दडपण आलं, मात्र कलावती रागातील त्या कव्वालीसाठी मी साजेसा वाद्यमेळ केला. ते गाणं किती हिट झालं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर पंचमने मोठय़ा आपुलकीने शाबासकी दिली, जी माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यासारखा संगीतकार पुन्हा होईल, असं मला वाटत नाही.

त्यांच्यामुळे नाव झालं -रणजीत गजमेर ऊर्फ कांचा
‘हरे राम हरे कृष्णा’ या चित्रपटाच्या निमित्ताने मी पंचमदांच्या जवळ आलो. त्यांना तालवाद्यांची प्रचंड आवड. आमच्या दार्जििलगची खासियत असणारे मादल हे तालवाद्य ‘कांची रे कांची रे’ या गाण्यात मी वाजवलं, त्यांना हे वाद्य इतकं आवडलं की त्यानंतर मादल हे त्यांच्या गाण्यांचं वैशिष्टय़ झालं. या गाण्यामुळे मी एवढा प्रसिद्ध झालो की मला कांचा हे नवं नाव मिळालं. माझ्यावर व मादलवर त्यांचा प्रचंड जीव होता. मला आठवतंय, ‘लेकर हम दिवाना दिल’ या गाण्याच्या रेकाँìडगला मी वेळेत पोहोचू शकलो नाही, गाणं रेकॉर्डही झालं. मात्र त्यात मादल न वापरल्याची पंचमदांना रुखरुख होती. अखेर त्यांनी माझ्याकडून मादलचा एक पीस वाजवून घेतला आणि मिक्सिंगच्या वेळी बेमालूमपणे मूळ गाण्यात तो मिसळला.