सध्या बॉलिवूड अभिनेत्यांसोबतच दाक्षिणात्य अभिनेत्यांची क्रेझ पाहायला मिळते. दाक्षिणात्य चित्रपट अर्जुन रेड्डीमध्ये मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता विजय देवरकोंडा अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. त्याने अभिनय कौशल्य आणि वेगळ्या स्टाइलने तरुणांची मने जिंकली आहेत. आता तो एका वेब सीरिजमध्ये दिसणार असल्याचे समोर आले आहे.
The News Minuteने दिलेल्या वृत्तानुसार, विजय आणि त्याचा भाऊ आनंद देवरकोंडा लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजचे नाव अद्याप समोर आलेले नाही. पण या सीरिजचे दिग्दर्शन केव्हीआर महेंद्र करणार असून संदीप वांगा यांनी स्क्रीप्ट लिहिली आहे.
विजय लवकरच पूरी जगन्नाथ यांच्या चित्रपटात दिसणार आहे. हा अॅक्शन चित्रपट असून तेलुगू आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो एका फायटरची भूमिका साकारणार आहे. तसेच हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित करण्यासाठी करण जोहर काम करणार आहे असे म्हटले जाते.
‘हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच इतर भाषांमध्येही त्याचे डबिंग करण्यात येणार आहे. तेलुगू व्यतिरिक्त मी स्वत: हिंदीमध्ये डब करण्याचा प्रयत्न करणार आहे’ असे विजयने म्हटले आहे.