थिएटर बंद झाले पण दररोज शेकडो लोकांची वर्दळ असणारे रेस्टॉरंट व बार यांना का सूट दिली, असा सवाल वंदना चित्रपट गृहाचे संयोजक व दिग्दर्शक विजू माने यांनी केला आहे. करोना विषाणूमुळे जागतिक पातळीवर होणारे विविध क्षेत्रातील नुकसान आपण पाहतच आहोत, पण मनोरंजन विश्वालाही याचा जोरदार फटका बसला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत  मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांतील नाटय़-चित्रपटगृहे, तरणतलाव ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे प्रेक्षकांची मोठी पंचाईत झाली असून निर्माते आणि वितरकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

‘लोकमत’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत विजू माने म्हणाले, “थिएटर बंद करण्याचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता. ज्यावेळी करोनाबद्दल सगळीकडे चर्चा सुरू झाली त्यावेळी आम्ही सॅनिटाइझरचा भरपूर प्रमाणावर साठा केला. आमच्या सगळ्या स्टाफसाठी मास्क घेतले. प्रत्येक शोनंतर थिएटरच्या खुर्च्यांचे हँडल, दरवाजे सॅनिटाइझरने साफ केले जायचे. जिथे जिथे प्रेक्षकांचे हात लागू शकतील, सगळीकडे सतत सॅनिटाइझेशन केलं जायचं. पण तरी तो निर्णय आला. अर्थातच लोकांच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण आहे. पण आम्ही थोडंसं दुर्दैवी यासाठी ठरलो, कारण सिंगल स्क्रीनमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मुळातच खूप कमी असते. आश्चर्य याचं वाटतं की काही आस्थापनांना यात सूट मिळाली. मोठमोठे बार, रेस्टॉरंट याठिकाणी दररोज खूप लोकांची वर्दळ असते. त्याठिकाणी तीच ताटं, तेच चमचे वारंवार वापरले जातात. तरीसुद्धा त्यांना सूट देण्यात आली आहे.” आम्ही हे आमच्यावर आलेलं नैसर्गिक संकट समजतो, असं म्हणत ३० मार्चनंतरच्या उपाययोजनांसाठी सज्ज असल्याचं विजू माने यांनी सांगितलं.

आणखी वाचा : करोनामुळे बहिणीचा मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी अभिनेत्याने मागितली मदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदेशी वाऱ्यातून वाहत आलेला करोना विषाणू  प्रत्येक देशात मुक्कामाला राहिला आहे. जगभरातील विविध देशांनंतर आता भारताला आणि पर्यायाने महाराष्ट्रालाही करोनाचा विळखा बसतो आहे.