‘ज्युरॅसिक पार्क’ सीरिजमधला पाचवा चित्रपट या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ज्युरॅसिक वर्ल्ड : फॉलन किंग्डम’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अडीच मिनिटांचा हा ट्रेलर अगदी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. कमालीचं तंत्रज्ञान, विएफएक्स इफेक्ट यामुळे अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्येही ज्युरॅसिक पार्क डोळ्यासमोर उभं राहतं. तर काही दृश्यं पाहताना क्षणात अंगावर अक्षरश: काटा येतो.

या चित्रपटाच्या निमित्तानं क्रिस प्रॅट आणि ब्राइस डलास ही जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे . १९९३ मध्ये ‘ज्युरॅसिक पार्क’नंतर १९९७ मध्ये ‘द लॉस्ट वर्ल्ड : ज्युरॅसिक पार्क’, २००१ मध्ये ‘ज्युरॅसिक पार्क ३’ आणि २०१५ मध्ये ‘ज्युरॅसिक वर्ल्ड’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. ‘ज्युरॅसिक वर्ल्ड: फॉलन किंग्डम’ हा चित्रपट २२ जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘ज्युरॅसिक वर्ल्ड’चा पुढचा भाग असणार आहे. ‘ज्युरॅसिक वर्ल्ड’ २०१५ मध्ये प्रदर्शित झाला याचा पुढचा भाग साडेतीन वर्षांनंतर प्रदर्शित होत आहे त्यामुळे सगळ्यांनाच या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.