बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब पटकाविला होता. १९९४ मध्ये तिला मिळालेल्या या यशामुळे सर्वत्रच आनंदाचे वातावरण होते. सुश्मिताने एक प्रकारे देशाचे नावंच उंचावल्याची भावना त्यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावर पाहायला मिळत होती. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सर्वांची मने जिंकण्याचे कसब अवगत असणाऱ्या सुश्मिताच्या चाहत्यांमध्ये आजही घट झालेली नाही. अशी ही चिरतरुण अभिनेत्री मिस युनिव्हर्सच्या त्याच स्तरावरुन पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्या किताबासाठी सुश्मिता स्पर्धक म्हणून उतरली होती त्याच किताबासाठी ती आता इतर सौंदर्यवतींचे परिक्षण करत आहे.

‘मिस युनिव्हर्स पिजन्ट’च्या परिक्षणासाठी मनीला येथे पोहचलेल्या सुश्मिताने ज्या मंचाने तिचे आयुष्य बदलले होते त्याच मंचावर रॅम्प वॉक केला. सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून ती त्याच मंचावर पुन्हा एकदा रॅम्प वॉक करताना दिसते. काळ्या रंगाच्या जम्पसूटवर सुश्मिताने लाल रंगाचा जॅकेट परिधान केलेला दिसतो. या व्हिडिओसह सुश्मिताने सर्व भारतीयांसाठी एक संदेशही लिहिला आहे. तिने लिहिलेय की, ‘हे सर्व भारतीयांसाठी आहे. पत्रकार परिषदेनंतर माझ्या सर्व सहपरिक्षक मित्रमंडळींनी एका सौंदर्यवतीचे आयुष्य बदणा-या मिस युनिव्हर्स २०१६च्या मंचावर रॅम्प वॉक केला. सर्व सौंदर्यवती अभिमानाने त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करतील. माझ्या सहपरिक्षक मित्रमंडळींनी आज या मंचावर रॅम्प वॉकसह नृत्यही केले. (अजूनही काही व्हिडिओ येणे बाकी आहे.) तुम्हा सर्वांना माझ्या हृदयात ठेवून मी आज या मंचावर चालत आहे. धन्यवाद भारत.’ या संदेशासह सुश्मिताने  #missuniverse1994 हा हॅशटॅगही दिला आहे.

भारतासाठी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी सुश्मिता सेन ही पहिली भारतीय सौंदर्यवती होती. तिच्यानंतर २००० साली लारा दत्ताने हा किताब जिंकला होता. त्यानंतर गेली १६ वर्षे भारत या किताबाची वाट पाहत आहे. यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत रोश्मिता हरिमुर्थी ही सौंदर्यवती भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकाविल्यानंतर महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटातून सुश्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुश्मिताला कविता खूप आवडतात. ती स्वतःही कविता करते. सुश्मिताचा ‘बीवी नंबर वन’ हा चित्रपट फार गाजला होता. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. सुश्मिताने ‘आँखे’, ‘समय’, ‘मैं हूं ना’, ‘बेवफा’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘मैने प्यार क्यू किया’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सुश्मिता आता लवकरच जंगली प्राण्यांच्या संवर्धनासाठी तयार करण्यात येणाऱ्या लघुपटात अभिनय करणार आहे. ‘आय अ‍ॅम द फॉरेस्ट’ असे या लघुपटाचे नाव आहे. तिच्या या सामाजिक जाणिवेमुळे तिचे चाहते तिच्यावर जास्त खूश होतील यात शंका नाही.