सध्या सोशल मीडियावर एका दीपिकाचा चर्चा सुरु आहे. ती दीपिका पादुकोण नव्हे, तर दीपिका म्हात्रे आहे. पहाटे ४ वाजल्यापासून दिवस सुरु होणाऱ्या दीपिका म्हात्रे आणि त्यांचा प्रवास पाहून सध्या अनेकांनाच त्यांचा हेवा वाटत आहे. श्रीमंत घरांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेपासून स्टँडअप कॉमेडीच्या दुनियेपर्यंतचा त्यांचा प्रवास खरंतर तितका सोपा नाही. रेल्वेमध्ये दागिने विकताना आपल्या वाट्याला आलेले अनुभव आणि घरकाम करतेवेळी आपल्या वाट्याला आलेल्या ‘मॅडम’ आणि त्यांचे चित्रविचित्र स्वभाव या दैनंदिन गोष्टींची सांगड घालत दीपिका स्टँडअप कॉमेडीच्या व्यासपीठावर आल्या.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दीपिका ज्या ठिकाणी काम करत होत्या त्या ठिकाणी घरकाम करणाऱ्या महिलांसाठीसुद्धा एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हाच दीपिका यांची कला एका पत्रकाराच्या नजरेस आल्या. ज्यानंतर त्यांच्या सांगण्यावरुन दीपिकाने स्टँडअप कॉमेडियन विश्वात अग्रस्थानी असणाऱ्या अदिती मित्तलशी संपर्क साधला. त्यानंतरच दीपिका यांनी पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आपली कला सादर केली.

‘इथे माणसांपेक्षा एखाद्या वस्तूची जास्त किंमत असते’, असं आपल्या विनोदी अंदाजात मांडणाऱ्या दीपिका त्यांच्या रोजच्या आयुष्यातील प्रसंगांवरच विनोद सादर करतात. ज्या हातांनी श्रीमंत घरांमध्ये आपण स्वयंपाक बनवतो, घरातल्या मंडळींची काळजी घेतो, त्याच आम्हा काम करणाऱ्यांसाठी अशा घरांमध्ये खाण्याची भांडीसुद्धा वेगळी ठेवली जातात हे कटू सत्य आता दीपिका यांनी पचवलं आहे. पण, यावर त्या भाष्य करायला विसरत नाहीत. चेहऱ्यावर असणारं हास्य हे बऱ्याच मोठ्या दु:खांना लपवत असल्याचं त्यांचा व्हिडिओ पाहून लगेचच लक्षात येत आहे.

वाचा : त्याची चोरी मी पकडली होती, एक्स बॉयफ्रेंडविषयी दीपिकाने केला खुलासा

मुख्य म्हणजे सुरुवातीला या क्षेत्रात येण्यासाठी दीपिका यांना त्यांच्या मुलांनीही विरोध केला होता. पण, आता मात्र त्यांचा विरोध मावळला आहे. इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून दीपिका यांच्या वाट्याला आता काही चांगल्या संधी आल्या आहेत. पण, अद्यापही त्यांच्या अर्थार्जनाचा प्रश्न सुटलेला नाही. काही शारीरिक अडचणींमुळे त्यांना घरकाम करणं सोडावं लागलं. त्यामुळे आता रेल्वेमध्ये दागिने विकून होणाऱ्या कमाईवरच त्यांना अवलंबून रहावं लागत आहे.