Gold. क्रीडा क्षेत्रामध्ये भारतीय खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत असतानाच आता याच धर्तीवर काही चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कलाविश्वातही या क्रीडाजगताची दखल घेतली जात असून, प्रेक्षकांचीही याला पसंती मिळत आहे. अशा या वातावरणात अभिनेता अक्षय कुमारही ‘गोल्ड’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉकी या खेळावर आधारित कथानकाच्या सहायायाने साकारलेल्या या चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘घर लायेंगे गोल्ड’, असे बोल असणारं हे गाणं एका वेगळ्याच जगात नेत असून, ते ऐकणाऱ्यांना प्रफुल्लित करत आहे. देशप्रेमाची झाक आणि त्याला दमदार संगीताची, कलाकारांची जोड मिळाल्यामुळे ते अधिकच प्रभावीपणे सर्वांपर्यंत पोहोचत आहे.

खेळाच्या माध्यमातून देशप्रेम व्यक्त करत एक जिद्द उराशी बाळगणारी मंडळी या गाण्याच्या माध्यामातून आपल्या भेटीला येत आहेत. खिलाडी कुमारचा आणि सहकलाकारांचा अभिनय, गाण्यातून साकारण्यात आलेल्या काळ या सर्व गोष्टींची घडी अगदी सुरेखपणे बसली आहे. सचिन जिगरने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला दलेर मेहंदी यांनी गायल्यामुळे एक दमदार आवाजही त्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचत आहे.

जावेद अख्तर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्यातून खिलाडी कुमारेच्या व्यक्तीरेखेवर जास्त प्रकाश टाकण्यात आला आहे. सुवर्णपदक मिळवून देत देशाचं नाव मोठ्या अभिमानाने आंतरराष्ट्रीय क्रीडा पटलावर पाहण्याची इच्छा आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठीचे प्रयत्न या गोष्टी गाण्यातून अधोरेखित करण्यात आल्या आहेत.

वाचा : मध्यंतरातील संवाद

रिमा कागती दिग्दर्शित या चित्रपटातून अक्षय कुमारसोबतच इतरही बरेच कलाकार झळकणार आहेत. टेलिव्हिजन अभिनेत्री मौनी रॉय या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ साली लंडनमध्ये झालेल्या १४व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाला पहिलं सुवर्ण पदक मिळालं होतं, त्यावर हा चित्रपट आधारित आहे. १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.