अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या सुरक्षेसाठी ‘दीपिका बचाओ’ या मोहिमेत स्वाक्षरी करण्यास नकार देत कंगना रणौत चर्चेत आली होती. आपल्या कठीण काळात कोणीच मदत न केल्याने तिने हा निर्णय घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता. या सर्व चर्चांवर आणि ‘पद्मावती’ या चित्रपटावरून सुरु असलेल्या वादावर तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणाने तिची मतं मांडली.

माझा दीपिकाला पाठिंबा आहे, मात्र शबाना आझमी यांच्या राजकारणाला नाही असं म्हणत कंगनाने ‘दीपिका बचाओ’ या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला. ही मोहिम आझमी यांनी सुरू केलेली. यासंदर्भात तिने स्पष्टीकरण दिलं की, ‘सद्यस्थिती पाहता आपल्या सर्वांनाच एकत्र येण्याची गरज आहे. वैयक्तिकरित्या किंवा एकत्र येऊन आपल्या सहकाऱ्यांसाठी काही मदत करणे शक्य असल्यास ती करावी. माझ्या सहकलाकारांना माझा पूर्ण पाठिंबा आहे.’ त्याचप्रमाणे तिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि दीपिकाला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांचाही निषेध केला.

PHOTOS : सलमा यांच्या वाढदिवसाला ‘खान’दान एकवटलं

‘हे खूप चुकीचं आहे. पण याचं मला आश्चर्य वाटत नाही कारण माझ्या बहिणीवर शाळेत असताना अॅसिड हल्ला झाला होता. व्यावसायिक वर्तुळाचा विचार केला तर मलाही तुरुंगात टाकण्यासाठी एक सुपरस्टार आटोकाट प्रयत्न करत आहे. आपल्या समाजात अशा गोष्टी होतच असतात. स्त्री-शक्तीला संपवू पाहणाऱ्या, मागास विचारसरणीच्या लोकांविरोधात सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. आम्ही मांडत असलेली मतं, आमचं काम आणि आमच्या चित्रपटातून अशा विचारसरणीविरोधात लढण्याचा प्रयत्न सुरूच आहे. त्यामुळे चित्रपट हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे. त्यामुळे चित्रपटांना विरोध होणं चुकीचं आहे,’ असं ती म्हणाली.

आझमींच्या डाव्या विरुद्ध उजव्या विचारसरणीच्या राजकारणामुळे मी सावध भूमिका घेत आहे, असं म्हणत कंगनाने ‘दीपिका बचाओ’ या मोहिमेअंतर्गातील याचिकेवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता.