रेल्वेच्या आकर्षणामुळे लहानपणी तुडूंब गर्दी असलेल्या रेल्वेस्थानकावर आपण कसे हरवलो याविषयीचे गुपित अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये उघड केले आहे. ही घटना घडली तेव्हा अमिताभ दोन वर्षाचे होते. लहानपणी अमिताभ बच्चन आईवडिलांबरोबर अलाहाबादपासून कराचीला जाणाऱ्या ट्रेनने आपल्या आजी-आजोबांना भेटायला जात असत. याविषयीची आठवण सांगताना अमिताभ म्हणताता, अलाहाबाद ते कराचीचा प्रवास दोन दिवसाचा असे, परतीच्या प्रवासादरम्यान ज्या रेल्वेस्थानकावर गाडी बदलावी लागत असे, तेथे प्रवाशांची खूप मोठी गर्दी उसळली, धावपळीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, या दरम्यान मी वडिलांबरोबर नसल्याचे अचानक माझ्या आईच्या लक्षात आले. त्यानंतर एकच धावपळ उडाली, माझ्या आई-वडिलांनी संपूर्ण रेल्वेस्थानकावर माझी शोधाशोध सुरू केली. मोठमोठ्याने मला हाका मारत आणि कोणी दोन वर्षाच्या मुलाला पाहिले आहे का अशी विचारणा करत मला शोधत होते. तेव्हढ्यात, खूप शोधाशोध करून खचलेल्या माझ्या पालकांजवळ एक प्रवासी आला आणि त्याने एका लहान मुलाला रेल्वेच्या पुलावर पाहिल्याचे सांगितले. माझे पालक धावतच मी ज्या ठिकाणी पुलावर बसलो होते तेथे आले. मी मात्र त्या पुलावर बरून मस्तपैकी येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेगाड्या पाहात बसलो होतो. आजही मी येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेगाड्या पाहातो आणि लहानपणीच्या आठवणीत रममाण होतो.
(छायाचित्र – अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगवरून)