अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती असणारी ट्विंकल खन्ना ही सोशल नेटवर्किंगवर उघडपणे आपली मते मांडण्यासाठी लोकप्रिय आहे. नुकतेच तिने केलेले एक ट्विटही तिच्या स्पष्टपणाचेच उदाहरण आहे. भिमा कोरेगावप्रकरणी देशातील वेगवेगळ्या भागातून पाच जणांना अटक करण्यात आल्यानंतर ट्विंकलने हे ट्विट केले आहे.

“स्वातंत्र्य एकाच वेळी नष्ट होत नाही, ते तुकड्या तुकड्यांमध्ये नष्ट होते. एक कार्यकर्ता, एक वकील, एक लेखक आणि अखेरीस आमच्यातील प्रत्येकजण” अशी ओळ ट्विंकलने ट्विट केली आहे. या ट्विटवर तिला पाठिंबा देणारे आणि विरोध करणाऱ्यांनी एकमेकांवर टिका केली आहे. मात्र तिने हे ट्विट याच संदर्भात केले आहे का याबद्दल निश्चिपणे सांगता येत नसले तरी या ट्विटखालील चर्चेमधून अनेकांनी ट्विंकलने याच अटकसत्राविरोधात या ट्विटमधून आपला आक्षेप नोंदवला असल्याचे म्हटले आहे. या ट्विटला साडेपाच हजारहून अधिक रिट्वीटस मिळाले असून २० हजारहून अधिक जणांनी हे ट्विट लाईक केले आहे.

मंगळवारी देशभरातील वेगवेगळ्या जागी ९ सामाजिक कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली. दिल्ली, फरिदाबाद, गोवा, मुंबई, रांची, हैद्राबाद अशा अनेक शहरांमध्ये एकाच वेळी करावाई करून या नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. कथित नक्षलवादी समर्थक वर्नन गोन्साल्विस, अरुण परेरा, वरवरा राव, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा या पाच जणांना पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली. पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात यांचा संबंध असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी १ जानेवारी २०१८ ला भीमा कोरेगाव येथे दंगल उसळली होती.