हॉलिवूडमध्ये सुरु झालेला #Metoo या हॅशटॅगचा ट्रेंड बघता बघता भारतातही आला. या ट्रेंडमध्ये फक्त सोशल मीडियावरच नव्हे तर इतरही ठिकाणी, विविध कार्यक्रमांमध्ये लैंगिक शोषण हा चर्चेचा विषय ठरला महिला याविषयी खुलेपणाने बोलू लागल्या. पण, या साऱ्याला काही गोष्टी मात्र अपवाद होत्या. एकिकडे बॉलिवूड अभिनेत्रींनीही लैंगिक शोषणाविषयी आपले मत मांडले. तर दुसरीकडे अभिनेत्री निम्रत कौरन हिने मात्र या मुद्द्यावर एक वेगळेच वक्तव्य करत, महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आणि सर्वांचे लक्ष वेधले.

हॉलिवूड अभिनेत्री खुलेपणाने त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांचे नाव सर्वांसमोर घेतात. पण, बॉलिवूडमध्ये मात्र तसे होत नाही. ही परिस्थिती नेमकी का उदभवते? अशा लोकांबद्दल बोलण्यास महिलांना संकोच का वाटतो? असा प्रश्न निम्रतने उपस्थित केला. त्यानंतर बॉलिवूडमध्ये लैंगिक शोषण करणाऱ्या कोणाचेच नाव समोर का आले नाही, असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर देत निम्रत म्हणाली, ‘लैंगिक शोषण पीडितेला कायद्याने सुरक्षितता दिली पाहिजे. आपण केलेल्या वक्तव्याचा किंवा आपण दिलेल्या उत्तरांचा आपल्या विरोधातच वापर होणार नाही ना? याची शंका या पीडितेच्या मनात असते. त्यामुळेच ती समोर येऊन बोलण्यासाठी धजत नाही. मुळात कायदा हाताशी असणाऱ्या महिलेच्या मनात कोणत्याच प्रकारची भीती नसली पाहिजे. एक समाज म्हणून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना जागृत करण्याची ही आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळेच महिला आणखी सक्षम होतील.’

वाचा : कर्ता, कर्म आणि ‘करनी’

‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी बोलताना निम्रतने अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर मत मांडत काही गोष्टींवर प्रकाश टाकला. अर्ध्याहून अधिक महिला या सर्व प्रकरणावर खुलेपणाने बोलणे टाळतात कारण, त्याना कायद्याची मदत मिळते खरी पण, त्यावर त्यांचा विश्वास नसतो. त्यामुळे अशा विषयांवर खुलेपणाने महिलांना बोलते करण्यासाठी मुळात त्यांची मानसिकताच बदलण्याची गरज आहे. त्यांच्यात कायदा, त्याविषयी असणारा दृष्टीकोन या सर्व गोष्टींविषयी विश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असेही तिने स्पष्ट केले.