२७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीची सद्यस्थिती, आव्हाने याचा ऊहापोह..

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
laxmikant berde son abhinay berde
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली. १८४३ मध्ये सांगली येथे मराठीतल्या या पहिल्या गद्य व संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली. त्यातील एक महत्त्वूर्ण वळण म्हणजे संगीत रंगभूमी. मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. ‘नाटक’ हे मराठी माणसाचे पहिले ‘वेड’ आहे असे म्हणतात ते चुकीचे नाही. चार मराठी माणसे एकत्र जमली की हमखास एखादे ‘नाटक’ सादर केले जातेच. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.

संगीत नाटकांची परंपरा मागे पडल्यानंतर सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक, विनोदी, फार्स, रहस्यमय अशा नाटकांनीही काही काळ गाजविला. नाटक म्हणजे खूप पात्रे असा समजही काही नाटकांनी खोटा ठरविला. मोजक्या पात्रांसह नाटकाचे प्रयोग होऊ लागले आणि त्यांना प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळाला. मराठी रंगभूमीवर काही काळ अश्लील नाटकांनीही ‘हैदोस’ घातला तर अलीकडच्या काही वर्षांत ‘चावट’ नाटकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठी रंगभूमीचे एक वैशिष्टय़ म्हणजे कोणताही एक नाटय़प्रकार येथे कायम टिकून राहिला नाही. काळानुरूप आणि प्रेक्षकांच्या वयोगटानुसार तसेच अभिरुचीनुसारही येणाऱ्या नाटकांचा काळ व सादर करण्याचे प्रकार सतत बदलत राहिले. नवे लेखक, दिग्दर्शक, कलाकार येथे घडत गेले. ही परंपराही खूप मोठी आहे.

अगोदर चित्रपट, त्यानंतर खासगी दूरचित्रवाहिन्या आणि आता स्मार्ट भ्रमणध्वनी, इंटरनेट, संगणक यांच्या आक्रमणामुळे नाटक टिकणार का अशीही शंका रसिकांच्या मनात येत आहे. दररोजच्या मराठी वृत्तपत्रांतून नाटकांच्या येणाऱ्या जाहिराती आणि होणारे प्रयोग हे चित्र सुखावह आहे. पण खरोखरच तशी परिस्थिती आहे का, तेच वास्तव आहे का, भारतातील अन्य प्रादेशिक भाषांमधील रंगभूमीपेक्षा मराठी रंगभूमी खरोखरच समृद्ध आहे का, बदलत्या काळात आणि परिस्थितीत टिकून राहील का, असे अनेक प्रश्न मनात भेडसावीत आहेत.

राज्यभरात आजही विविध संस्थांतर्फे एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘लोकांकिका’स्पर्धेला महाविद्यालयीन तरुणांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अशा स्पधरामधून लेखन, दिग्दर्शन, अभिनय क्षेत्रांत आणि रंगभूमीच्या अन्य तांत्रिक विभागासाठीही नवी गुणवत्ता पुढे येण्यास मोलाची मदत होत आहे.

वृत्तपत्रांतून मराठी नाटकांच्या येणाऱ्या जाहिराती पाहिल्या तर सगळी नाटके जोरदार व्यवसाय करत असतील असे वाटते. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. काही नाटकांचा अपवाद वगळता अन्य नाटकांना चांगले बुकिंग मिळत नाही. एकेकाळी काही मातब्बर नाटय़गृहातून दिवसातून मराठी नाटकांचे तीन-तीन प्रयोग होत असत. नाटय़गृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकत असे. आता रविवार किंवा अन्य सुट्टीच्या दिवशीही अपवाद वगळता नाटक ‘हाऊसफुल्ल’ जात नाही, हे वास्तव आहे. नाटय़गृहाची भरमसाठ भाडी, जाहिरातींचे वाढलेले दर, कलाकारांची ‘नाईट’, एकमेकांशी असलेली स्पर्धा, नाटकाचा निर्मिती खर्च आणि तुलनेत मिळणारे उत्पन्न, प्रेक्षकांचा प्रतिसाद, तरुण पिढीचे पाठ फिरविणे या चक्रव्यूहात आजचे मराठी नाटक सुरू आहे.

काही नाटकांचा अपवाद वगळता नाटकाच्या प्रयोगाला १८ ते २५ या वयोगटांतील किती तरुणाई नाटक पाहायला येते, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तरुणांचे किंवा त्यांच्या विषयाशी संबंधित नाटक असेल तर तरुण वर्गाची नाटकाला गर्दी होते. अन्यथा नाटकाला येणारा बहुतांश प्रेक्षक हा ४५-५० या  आणि त्यापुढील वयोगटाचाच आहे, असे चित्र पाहायला मिळते. नाटकाला तरुण किंवा शालेय-महाविद्यालयीन प्रेक्षक वर्ग मिळविणे हे आजच्या वर्तमानातील खरे आव्हान आहे. कारण हाच वर्ग भविष्यातील मराठी नाटकांना असलेला प्रेक्षकवर्ग आहे. त्यांना मराठी नाटकांकडे कसे आकृष्ट करून घेता येईल हे पाहिले पाहिजे.

सध्याची तरुणाई ही स्मार्ट भ्रमणध्वनी, संगणक, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर यात गुरफटलेली आहे. या सगळ्या माध्यमांकडे शत्रू म्हणून न पाहता मित्र म्हणून पाहून त्याचा मराठी नाटकांच्या प्रसिद्धीसाठी तसेच तरुणाईला मराठी नाटकांकडे वळविण्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल यावरही विशेष भर दिला गेला पाहिजे. दैनंदिन जीवनात भेडसाविणारे प्रश्न आणि समाजात जे घडतंय त्याचे प्रतिबिंब मराठी नाटकांमधून उमटले गेले पाहिजे. काही नाटकांच्या माध्यमातून तसा प्रयत्न होत असला तरी ते प्रमाण कमी आहे. अर्थात यावर एक बाजू अशीही आहे की, रोजच्या धकाधकीच्या आणि ताण-तणावाच्या व्यापातून थोडा वेळ निखळ मनोरंजन आणि आनंद घेण्यासाठी प्रेक्षक येत असतो. त्यामुळे बहुतांश प्रेक्षकांनाही अशी गंभीर नाटके आवडत नाहीत, असे काही जण म्हणतात. पण गंभीर विषयांवरील नाटकांनाही आपल्याच रसिक प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद देत ही नाटके उचलून धरली आहेत, या वास्तवाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. मध्यंतरी मराठी रंगभूमीवर विनोदी नाटकांची लाट आली होती. पण निखळ विनोद कुठेतरी हरवला आहे, असे वाटते. मानवी नातेसंबंध, नात्यांची गुंतागुंत, स्त्री-पुरुष संबंध, स्त्रीच्या जाणिवा, तिचे प्रश्न अशा विषयांवरील नाटकेही सध्या रंगभूमीवर सुरू आहेत. नाटकाचे विषय गंभीर असले तरी त्या नाटकांनाही चांगला प्रेक्षकवर्ग आहे.

अर्थात हे सगळे व्यावसायिक मराठी रंगभूमीविषयी लिहिले आहे. प्रायोगिक, समांतर, बाल, कामगार रंगभूमी असे मराठी रंगभूमीचे अन्य प्रवाहही तितकेच महत्त्वाचे आहेत. पण प्रेक्षकांचा सर्वाधिक पाठिंबा आणि प्रत्यक्ष सहभाग हा व्यावसायिक रंगभूमीला असल्याने त्याविषयी लिहिले आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दरवर्षी मोठय़ा संख्येत नाटके सादर होत असली तरी ती सगळीच चालतात असे नाही. नाटकांची संख्या आणि गुणवत्ता याचे प्रमाण नेहमीच विषम राहिलेले आहे. पण माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही अजूनही मराठी नाटक सुरू आहे, नवे रंगकर्मी पुढे येत आहेत ही नक्कीच आनंदाची बाब आहे.

नाटक हा मनोरंजनाचा शेवटचा पर्याय

आज लोकांसाठी नाटक हा मनोरंजनाचा शेवटचा पर्याय आहे. त्यामुळे सर्व निर्मात्यांनी आणि रंगकर्मीनी जबाबदारीने काम करून रंगभूमीचे महत्त्व टिकवायला हवे. नाटकाबद्दल नव्याने प्रेम निर्माण करायला हवे. युवा रंगकर्मीना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक तो पाठिंबा मिळायला हवा. नवीन रंगकर्मीची नवीन पिढी रंगभूमीवर यायला हवी

– प्रशांत दामले, व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाचे अध्यक्ष