करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण जग त्रस्त झालं आहे. आतापर्यंत जगात हजारोंच्या संख्येने करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामध्येच अनेक देशांमध्ये लॉकडाउन केल्यामुळे त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवरही होताना दिसून येत आहे. भारतातही लॉकडाउन आहे. या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सर्व कामकाज बंद आहे. या बंदच्या दरम्यान हातावर पोट असलेल्या कामगारांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यशराज फिल्म्सने या मजुरांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

आतापर्यंत अनेक सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटी गरजूंच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. काहींनी आर्थिक मदत केली आहे. तर काहींनी शिधा वापट केला आहे.  यामध्येच आता यशराज फिल्म्सने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘फिल्मफेअर डॉट कॉम’नुसार, कलाविश्वात रोजंदरीवर काम करणाऱ्या कामगारांना यशराज फिल्म्सकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

कलाविश्वात कारपेंटर, स्पॉट बॉय यांसारखे अनेक लहान-मोठे काम करणारे कामगार आहेत. या साऱ्यांनाच या दिवसात आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे या कामगारांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याचा निर्णय यशराज फिल्म्सने घेतला आहे. विशेष म्हणजे यशराज फिल्म्सने जवळपास १.५ कोटी रुपयांची तरतूद केली असून या निधीमधून कामगारांना मदत केली जाणार आहे.

दरम्यान,आतापर्यंत कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी धावून आले आहेत. अभिनेता सलमान खानने तब्बल २५ हजार कर्मचाऱ्यांना मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी पंतप्रधान मदतनिधीच्या माध्यमातून मदत केली आहे.