News Flash

ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात योयो हनी सिंगचा ‘गोंगाट’

वाद्यांच्या दणदणाटामध्ये अनोख्या अंदाजात गाणी सादर करणाऱ्या आणि सध्या तमाम तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला रॅप गायक योयो हनी सिंग याला चक्क ध्वनिप्रदूषणाला आळा

| July 29, 2014 06:42 am

वाद्यांच्या दणदणाटामध्ये अनोख्या अंदाजात गाणी सादर करणाऱ्या आणि सध्या तमाम तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला रॅप गायक योयो हनी सिंग याला चक्क ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सुरू असेलल्या मोहिमेसाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी पाचारण केल्याच्या घटनेने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याची मोहीम ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी सध्या मोठय़ा प्रमाणात सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हनी सिंग याला पाचारण करण्यात आले होते. येथील कोरम मॉलमध्ये रविवारी रात्री सातपासूनच तरुणाईची गर्दी उसळली होती. तरुण-तरुणींचे जथ्थे एकापाठोपाठ धडकत होते. पण तब्बल १० वाजेपर्यंत हनी सिंगचा पत्ता नव्हता. मॉलचे सर्व मजले गर्दीने खच्च भरून गेले होते. अखेर सव्वा दहाच्या सुमारास हनी सिंगचे आगमन झाले आणि शिटय़ांच्या आवाजाने वातावरण भरून गेले. त्याला पाहण्यासाठी, दुरून का होऊना त्याची छबी कॅमेराबद्ध करण्यासाठी तरुण-तरुणींमध्ये प्रचंड ढकलाढकली सुरू झाली. साडेदहा वाजता तो स्टेजवर आला आणि त्याने ‘लुंगी डान्स’ हे गाणे सादर केले. त्या वेळी शिटय़ा आणि आरडाओरडा यांनी आवाजाची अत्युच्च पातळी गाठली होती. या वेळी हनी सिंग याने युवकांना ध्वनिप्रदूषण करू नका असा अनाहुतपणे सल्ला दिला. वाहन चालवताना उगाचच हॉर्न वाजवू नका, असेही त्याने सांगितले. विशेष म्हणजे तो हा संदेश देत असतानाच तेथे असलेल्या एका महिलेने मात्र ध्वनिप्रदूषणाचा सर्वाधिक वाद्यांचा वापर करणाराच ध्वनिप्रदूषणाला आळा घाला, असे सांगतोय हे आश्चर्यकारक असल्याचे मत नोंदविले.
सेलिब्रेटींच्या माध्यामातून मोहीम
याबाबत ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोणत्याही मोहिमेच्या यशस्वितेसााठी सेलिब्रेटी आणल्यास त्याचा योग्य परिणाम आणि संदेश नागरिकांपर्यंत जातो. त्यामुळे योयो हनी सिंग याला या मोहिमेसाठी आणणे मला चुकीचे वाटत नाही. तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला हनी सिंग याने ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तरुणाईबरोबर संवाद साधला आणि त्याचा सकारात्मक परिमाण येत्या काही दिवसांत दिसून येईल. ही मोहीम महिनाभर सुरू राहणार असून आणखी काही सेलिब्रेटीजना यासाठी आमंत्रित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2014 6:42 am

Web Title: yo yo honey singhs voice against noise pollution
Next Stories
1 १०० कोटींच्या ‘किक’साठी सलमान ईदच्या प्रतीक्षेत
2 पाकिस्तानी मालिकेतील चेहऱ्यांना बॉलीवूडचे वेध
3 भारतीय-अमेरिकन गायक मिकी सिंगचा भारतात कार्यक्रम
Just Now!
X