हिंदी चित्रपटसृष्टीतील काही आघाडीच्या आणि हॅण्डसम अभिनेत्यांच्या यादीत विनोद खन्ना यांचं नाव घेतलं जायचं. असा हा हॅण्डसम अभिनेता आता काळाच्या पडद्याआड गेला. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं प्रदीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘दयावान’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘कुरबानी’, ‘हेराफेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटांसह आणखी बऱ्याच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या विनोद खन्ना यांच्या आठवणींना आज उजाळा देण्यात येत आहे. अशा या कलाकाराच्या योगदानाला सलाम करत जाणून घेऊया विनोद खन्ना यांच्याबद्दलच्या १० गोष्टी…

  • पेशावरमध्ये एका पंजाबी व्यावसायिक कुटुंबात विनोद खन्ना यांचा जन्म झाला होता. त्यांच्या कुटुंबाचा टेक्सटाइल्सचा व्यवसाय होता.
  • ‘सोलवा साल’ आणि ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटांचा विनोद खन्ना यांच्यावर फार प्रभाव होता. किंबहुना याच चित्रपटांमुळे त्यांना अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली.
  • मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकण्यापूर्वी विनोद खन्ना यांनी खलनायकाच्या भूमिकेतून बॉलिवूड कारकीर्दीला सुरुवात केली होती.
  • विनोद खन्ना यांच्या पश्चात् त्यांची पत्नी आणि चार मुलं असा परिवार आहे. दोन वेळा लग्न झालेल्या विनोद खन्ना यांना पहिल्या पत्नीपासून अभिनेता अक्षय खन्ना आणि अभिनेता राहुल खन्ना आणि दुसऱ्या पत्नीपासून साक्षी खन्ना आणि श्रद्धा खन्ना ही मुलं आहेत.
  • १९८२ मध्ये कारकिर्दीच्या परमोच्च शिखरावर असतानाच विनोद खन्ना यांनी ओशो रजनीश या त्यांच्या गुरुचा मार्ग स्वीकारला होता. त्यानंतर थेट पाच वर्षांनी विनोद खन्ना यांनी चित्रपसृष्टीत पुनरागमन केलं होतं.

  • चित्रपटसृष्टीत कारकीर्दीत विनोद खन्ना यांचं नाव काही अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं होतं. त्यातीलच एक अभिनेत्री त्यांच्यापेक्षा वयाने १२ वर्षे लहान होती.
  • १९७६ मध्ये अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबत त्यांनी केलेल्या एका प्रणयदृश्यावरुन त्यावेळी चित्रपटसृष्टीत बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.
  • विविध चित्रपटांमध्ये बऱ्याच कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या विनोद खन्ना यांचे अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे चित्रपट विशेष गाजले. त्यापैकीच काही चित्रपट म्हणजे, ‘हेराफेरी’ (१९७६), ‘खून पसिना’ (१९७७), ‘अमर अकबर अँथनी’ (१९७७), ‘परवरिश’ (१९७७) आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ (१९७८)

  • विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या विनोद खन्ना याचा आणखी एक चित्रपट चर्चेत आला होता, तो चित्रपट म्हणजे ‘अचानक’. एकही गाणं नसलेल्या चित्रपटामध्ये त्यांनी आपल्याच पत्नीचा खून करणाऱ्या पतीची भूमिका साकारली होती. के. एम. नानावटी केसच्या सत्यघटनेवर या चित्रपटाचे कथानक आधारले होते. मुख्य म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये ‘रुस्तम’ या चित्रपटातून नानावटी केसवर प्रकाश टाकण्यात आला.
  • विशेष म्हणजे चित्रपट आणि राजकीय क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या या अभिनेत्याने टेलिव्हिजन विश्वावरही आपली छाप पाडली आहे. ‘मेरे अपने’ या मालिकेमध्ये विनोद खन्ना यांनी स्मृती इराणीच्या पतीची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 things you need to know about veteran bollywood actor vinod khannas life
First published on: 27-04-2017 at 13:23 IST