‘कार्स ३’, ‘स्पायडरमॅन होमकमिंग’ आणि ‘ट्रान्सफॉर्मर्स द लास्ट नाइट’
एप्रिल-मे महिन्यात हॉलीवूड सिक्वलपट मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शित होत आले आहेत. यावर्षी मात्र ही प्रथा बंद करीत यंदा जून-जुलैमध्ये हॉलीवूड सिक्वलपटांचा पाऊस तिकीटबारीवर पडणार आहे.
मे महिन्यात ‘गार्डियन ऑफ द गॅलॅक्सी’चा दुसरा भाग आणि महिना संपता संपता ‘द पायरेट्स ऑफ द कॅरेबिअन’चा पाचवा भाग असे दोन सिक्वलपट कसेबसे प्रदर्शित झाले. पण मुलांसाठी आकर्षण असलेले अॅनिमेशनपट मात्र या सुट्टीत दूर राहिले होते. जून आणि जुलै या दोन महिन्यांत बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असे सिक्वलपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होणार आहेत. त्याचा शुभारंभ ‘वंडर वुमन’ या चित्रपटाने झाला आहे असे म्हणता येईल. ‘वंडर वुमन’ हा रूढार्थाने सिक्वलपट आहे असे म्हणता येणार नाही. गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यात ‘डीसी कॉमिक्स’ने ‘बॅटमॅन वर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
यात ‘वंडर वुमन’ या डीसीच्याच सुपरहिरोची छोटीशी भूमिका होती. आता ही वंडर वुमन स्वत:ची पूर्ण वेगळी हिरॉईक कथा घेऊन लोकांसमोर अवतरली आहे. हॉलीवूड अभिनेत्री गॅल गॅदॉत हिने ‘वंडर वुमन’ साकारली आहे. ‘द ममी’ या चित्रपट मालिकेचा हा चौथा पुनर्जन्म आहे. १९३२ साली पहिला ‘द ममी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. १९५५ पर्यंत सहा चित्रपट करून ही मालिका पूर्ण झाली.
त्यानंतर १९५९ ते ७१ दरम्यान पुन्हा चार ‘ममी’पट आले. तिसऱ्यांदा जेव्हा त्याचा जन्म झाला १९९९ साली तो तीन चित्रपटांसाठी.. २००८ साली या चित्रपट त्रयीतला शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता ९ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘द ममी’मध्ये टॉम क्रुझ मुख्य भूमिकेत आहे.
‘कार्स’ या थ्रीडी अॅनिमेशनपटाचा तिसरा भाग १६ जूनला प्रदर्शित होणार आहे. पाठोपाठ २३ जूनला ‘ट्रान्सफॉर्मर्स : द लास्ट नाइट’ हा ‘ट्रान्सफॉर्मर्स’ चित्रपट मालिकेतला पाचवा सिक्वलपट प्रदर्शित होतो आहे. तर ३० जूनला ‘डेस्पिकेबल मी’ या गाजलेल्या अॅनिमेशनपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होतो आहे.
जुलै महिन्यातही सिक्वलपटांचा धडाका लागला आहे. जुलैचा पहिलाच आठवडा ‘स्पायडरमॅन : होमकमिंग’चा आहे. स्पायडरमॅनचा तिसरा अवतार जो सध्या हॉलीवूड अभिनेता टॉम हॉलंडच्या रूपात दिसणार आहे.