निरमा डिटर्जंट पावडरच्या जाहिरातीमुळे अभिनेता अक्षय कुमारविरोधात दोन जणांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या जाहिरातीत अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निरमाच्या जाहिरातीत अक्षय आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर कलाकारांना मावळ्यांच्या वेशात दाखवण्यात आलं आहे. याप्रकरणी त्याने माफी मागावी अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.

जाहिरातीत काय आहे?

निरमा डिटर्जंट पावडरच्या जाहिरातीत अक्षय कुमार आणि इतर मावळे लढाई करून दरबारात परतलेले असतात. त्यावेळी सुवासिनी त्यांचे औक्षण करतात. एक महिला युद्धात मळलेल्या, खराब झालेल्या कपड्यांवर भाष्य करते आणि हे कपडे तर आम्हालाच धुवावे लागतील असे म्हणते. त्यानंतर अक्षय म्हणतो, “महाराज की सेना दुश्मनों को धोना जानती है और अपने कपडे भी”, त्याच्या या संवादानंतर अक्षयसह इतर मावळे कपडे धुताना दाखवण्यात आले आहेत. जाहिरातीत दाखवलेला हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आहे, म्हणून अक्षयने माफी मागावी अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.

सोशल मीडियावरही या जाहिरातीवरून जोरदार टीका करण्यात आली. #BoycottNirma असा हॅशटॅगसुद्धा ट्रेण्ड झाला होता.